सातार्‍यात एअरफोर्सचा जवान हनी ट्रॅपमध्ये | पुढारी

सातार्‍यात एअरफोर्सचा जवान हनी ट्रॅपमध्ये

सातारा : पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर युवतीची ओळख झाल्यानंतर भेटीसाठी सातारा ठरल्यानंतर मात्र एअरफोर्स पंजाब येथे कर्तव्य बजावत असलेल्या 21 वर्षीय जवानाला पुणे येथील युवतीने विनयभंगाची धमकी देत 68 हजार रुपयांची खंडणी उकळली. यावेळी पैशांची जादा मागणी झाल्याने झालेल्या झटापटीत जवानावर चाकूचे वार झाले. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर मात्र पोलिसांनी युवतीसह चौघांना गजाआड केले.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 2 रोजी मध्यरात्री सातारा रेल्वेस्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेची अधिक पार्श्वभूमी अशी आहे, तक्रारदार हा पंजाब एअरफोर्समध्ये कर्तव्य बजावत असून तो मूळचा राजस्थान राज्यातील आहे. तक्रारदार जवानाची इन्स्टाग्राम या सोशल मीडियातून पुण्यातील युवतीशी ओळख झाली. दोघांची ओळख पुढे घट्ट होत प्रेमात रूपांतर झाले. यातूनच त्यांनी सातारा येथे भेटण्याचे ठरवले. एअरफोर्सचा जवान सातार्‍यात आल्यानंतर युवतीसोबत त्याची भेट झाली.

दोघांची भेट झाल्यानंतर काही वेळातच युवतीने जवानाला पुढे बाहेर येण्यास सांगितले. त्यानुसार जवान आला असता तेथे एक ओमनी कार लागलेली होती. यामध्ये अनोळखी तिघेजण होते. युवतीसह संशयितांनी जवानाला ओमनी कारमध्ये बसायला सांगितले.

त्यानुसार जवान कारमध्ये बसल्यानंतर मात्र त्याला संशयितांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. 5 लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास विनयभंगाची तक्रार पोलिस ठाण्यात करणार असल्याचे सांगितले. या घटनेमुळे एअरफोर्सच्या जवानाला घाम फुटला. सर्व प्रकार जवानाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गुगल पे द्वारे 64 हजार 135 रुपये ट्रान्सफर केले व तेवढेच पैसे असल्याचे सांगितले. मात्र संशयितांनी जवाना ब्लॅकमेल करत दुसर्‍याकडून पैसे मागवून घे व आम्हाला पैसे आणखी पाठव, असा तगादा लावला. यामुळे जवान गोंधळून गेला.

जवान ऐकत नसल्याचे पाहून संशयितांनी जवानाच्या खिशातील रोख 2500 रुपये काढले. त्यानंतर दोन मोबाईल हिसकावून घेतले. यावेळी मात्र जवानाने झटापट करण्यास सुरुवात केल्यानंतर एका संशयिताने धारदार चाकू काढून जवानावर दोनवेळा वार केले. या घटनेत जवान जखमी झाला. जवान झटापट करण्याचे थांबत नसल्याचे पाहून दुसर्‍या एका संशयिताने बंदूक काढली व जवानावर रोखली. मात्र संबंधित बंदूक नसून ते लायटर असल्याचे समोर आले. या सर्व घटनेने एअरफोर्सचा जवान गांगरुन गेला.

शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर सातारा पोलिस अलर्ट झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) तपास करत अधिक माहिती घेतली. संशयित रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून अटक केली.

संशयित युवती मूळची राजस्थानची असून सध्या ती पुणे येथे राहत आहे. उर्वरीत संशयितांची पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली असून सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक वापर करावा. अनोळखी व्यक्तींशी बोलू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button