गोळीबार प्रकरण : ‘मैत्रिणी’चा बुलावा अर्जुनको ‘ले गया’ | पुढारी

गोळीबार प्रकरण : ‘मैत्रिणी’चा बुलावा अर्जुनको ‘ले गया’

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात भरदिवसा अर्जून यादव उर्फ राणा याचा प्रतिस्पर्धी टोळीकडून प्लॅनिंग करुन मर्डर झाल्याचे समोर आले. इन्स्टाग्रामवर मुलीचे फेक अकाऊंट काढून अर्जूनवर प्रेमाचे जाळे टाकण्यात आले. यात तो अलगद अडकत गेला. शनिवारी इन्स्टाच्या फेक मैत्रिणीने बोलवल्यानेच तो सातारा येथे आला व तेथे दबा धरुन बसलेल्या पोरांनी अर्जूनचा डोक्यात गोळ्या घालून गेम वाजवला. दरम्यान, 3 महिन्यांपासून यासाठी अर्जून संशयितांच्या रडारवर होता.

अर्जूनचा मर्डर झाल्यानंतर पोलिसांचा भुईंज व वाई तपासाचा केंद्रबिंदू होता. या मर्डरला जुनी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरुवात केली. मात्र बहुतेक संशयित पसार झाल्याने संपूर्ण दीड दिवस पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (एलसीबी) संशयितांची नेमकी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पथक तयार केले. वाई परिसरातून संशयित तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली. मात्र संशयित सर्वजण अल्पवयीन असल्याने पोलिसांवर तपासाच्या मर्यादा आल्या. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.

अर्जून सातार्‍यातील नटराज मंदीराजवळ येणार असल्याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? असा प्रश्न संशयितांना विचारताच संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया बाबतची माहिती दिली. अर्जूनवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातूनच तो जेलमध्ये होता. मात्र कोरोना कालावधीत त्याला पॅरोल मिळाल्याने तो बाहेर होता. संशयितांनी हीच संधी साधत इन्स्टाग्रामवर मुलीचे फेक अकाऊंट तयार केले. त्याद्वारे अर्जूनवर संशयितांनी प्रेमाचे खोटे जाळे टाकले. इन्स्टावरील मुलगी वारंवार भेटायला आतूर असल्याचे सांगत होती. मात्र अर्जून वाई, सातार्‍यापासून लांब राहत होता. मुलीचे वारंवार इन्स्टाग्रामवर भेटण्यासाठी मेसेज येत असल्याने अर्जूनही शहारला होता. यातूनच भेटीचा पेंडिंग विषय काढण्यासाठी शनिवारची भेट ठरली. मात्र दबा धरुन बसलेल्या पोरांनी दोन राऊंड फायर करत खेळ खल्लास केला.

या मर्डरमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इन्स्टाग्रामचे फेक अकाऊंट नेमके कोणी काढले? आतापर्यंत ते कोणी कोणी ऑपरेट केले? बंदूका कोठून आणल्या? त्या किती रुपयांना विकत घेतल्या? संशयित मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या संपर्कात कोणकोण होते? बंदूक चालवण्यासाठी कोणी शिकवले? बंदूक चालवण्याचे ट्रेनिंग कुठे दिले गेले? या सर्व बाबींसाठी पैसे कोणी पुरवले? असे अनेक सवाल उपस्थित झाले असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

बॅलेस्टिक रिपोर्ट महत्वाचा…

प्राथमिक माहितीनुसार अर्जूनला संपवण्यासाठीच संशयित तेथे आले होते. यासाठी पूर्ण प्लॅनिंग झाले होते. एका बंदूकीमध्ये काम तमाम झाले नाही तर दुसरी बंदूक असावी, यासाठी दोन बंदूका असल्याचे समोर येत आहे. अर्जूनवर एकूण दोन राऊंड फायर झाले आहेत. एक गोळी डोक्यात पाठीमागून तर दुसरी पोटात गेलेली आहे. यामुळे एकाच बंदूकीतून फायर झाला आहे की दोन बंदूकातून फायर झाला आहे हे बॅलेस्टीक रिपोर्टवरुन समोर येणार आहे.

मित्रांची कुसंगत अन् गुन्हेगारीचे फॅड…

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची कौटुंबिक तसेच वैयक्तिक माहिती समोर आली आहे. दोन संशयित 16 तर एकजण 17 वर्षाचा आहे. यातील दोघांची परिस्थिती बेताची आहे. एकाला वडील नसून त्याची आई काम करते. केवळ मित्रांच्या कुसंगतीमुळे संशयित भरकटले असून त्यातूनच त्यांना गुन्हेगारीचे फॅड लागले. यातील एका संशयिताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये कॉलेजमध्ये तो शिक्षकांना दमबाजी करत असून त्याचे वजन अवघे 32 किलो आहे.

Back to top button