फलटण : माऊलींच्या पालखी स्वागताची फलटणकरांना आतुरता | पुढारी

फलटण : माऊलींच्या पालखी स्वागताची फलटणकरांना आतुरता

फलटण : अजय माळवे
संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 1 व 2 जुलै रोजी फलटण शहरात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. वारकर्‍यांच्या व पालखी सोहळ्याच्या नियोजनाची फलटण नगरपरिषद व प्रशासनाने जय्यत तयारी केली असून स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर येत असलेल्या ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर आतुर झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पालखी सोहळ्याचे उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. महसूल, पोलिस, आरोग्य विभाग यांनी सर्व कामे करुन घेतली असून तब्बल चार लाखाहून अधिक वारकरी येणार असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य विभाग, महावितरण यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे. कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. फलटण शहर उपविभागाकडून पालखी मुक्काम काळामध्ये विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी तसेच कोणताही अपघात होऊ नये म्हणून विविध कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. उच्चदाब व लघुदाब वाहीनीस अडथळा करणार्‍या विविध ठिकाणच्या झाडांच्या फांद्या काढण्यात आल्या आहेत. तसेच उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे अनेक ठिकाणचे धोकादायक पोल सरळ करण्यात आले आहेत. सर्वच रोहित्रांचे बॉक्स दुरुस्त करण्यात आले आहेत. पालखी मुक्कामाच्या दिवशी वारकर्‍यांना मोफत तात्पुरत्या स्वरूपात विज जोडणी देण्यासाठी पोलवरतीच स्विच बोर्ड, जनसेट बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळ येथे माऊली मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची विज जोडणी देण्यात आली आहे. विद्युत सुरक्षिततेच्या कारणास्तव पालखी ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गावर विविध ठिकाणी सुरक्षा फलक देखील लावण्यात आलेे आहेत. पालखी मुक्कामा दिवशी पुर्णवेळ 110 कर्मचारी व 10 अभियंते यांची नेमणूक भरारी पथकामध्ये करण्यात आली आहे.

नगरपालिकेकडून तब्बल एक हजार मोबाईल टॉयलेट, 1 हजार शोष खड्डे शौचालय, महिलांना स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, पालखी मार्गवारील असलेल्या साईड पट्ट्या भरण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अगोदरच एक दिवस फॉगिंग केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आठ पॉईंट उपलब्ध आहेत. तसेच मुधोजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, मलठण येथे मोठ्या प्रमाणात वारकरी मुक्कामी असतात तिथे प्रत्येकी 100 टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर खजिना हौद, पचबत्ती चौक येथे मदत केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच संपूर्ण शहरातील विविध भागात सात टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवले जाणार आहे.
रस्त्यात किंवा शहरात कुठेही वारकर्‍यांच्या वाहनांचा घोटाळा झाल्यास क्रेन व पाच मेकॅनिक नेमले आहेत. त्यांच्याद्वारे वाहनांची मोफत दुरुस्ती केली जाणार आहे. पुणे महापालिका व फलटण नगरपालिका यांच्या दोन अ‍ॅम्बुलन्स, दोन अग्निशामक, दोन रेस्क्यू टीम मागवण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरून आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सांस्कृतिक भवन व त्या पाठीमागे असणार्‍या नवीन इमारतीमध्ये राहण्याची सोय केली आहे. पिण्याच्या पाण्याचा तब्बल तीस दिवस पुरेल एवढा साठा आहे. फलटण नगरपरिषद व सर्वच प्रशासनाने पालखी सोहळ्या बरोबर आलेल्या वारकर्‍यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे.

पालखी मार्गावर दिशादर्शक फलक…

फलटण येथे माऊलींची पालखी दोन दिवस मुक्कामी आहे. या कालावधीमध्ये सिंगल युज प्लास्टिकला बंदी असून कोणीही प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. तसेच सर्वच शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे. तसेच पालखी मार्गवार दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. याचबरोबर माहिती नकाशा प्रसारित केला जाणार आहे. ज्या ठिकाणी पालखी विसावा घेणार आहे तिथे दर्शनबारीसाठी सोय करण्यात आली आहे.

Back to top button