लोणंद : माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर | पुढारी

लोणंद : माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर

लोणंद : शशिकांत जाधव
दोन वर्षांच्या खंडानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी निघाली आहे. लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. पालखी तळावर माऊलींच्या पादुका ठेवल्यानंतर दर्शनासाठी भक्‍तांचा महापूर लोटल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांचे नियोजन केल्याने कोणताही गोंधळ उडाला नाही. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहर्‍यावर माऊलीच भेटल्याचे समाधान दिसत होते. दोन दिवसांच्या मुक्‍काम काळात लोणंदनगरी विठुरायाचा गजर सुरू आहे. त्यामुळे लोणंदनगरीला पंढरीचे स्वरूप आले आहे.

माऊलींचा पालखी सोहळा लोणंदच्या पालखी तळावर विसावल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. माऊलींच्या पालखी तळाबरोबर संपूर्ण लोणंद नगरी व परिसर रांत्र – दिवस टाळ मृंदगाचा गजर, भजन, किर्तनाने दंग झाला होता. लोणंदच्या पालखी तळावरील माऊलींच्या तंबू बरोबरच मालक, पालखी संस्थान, चोपदार, शितोळे सरकार वासकर आदी मानाच्या दिंड्यांचा होता. या ठिकाणी पोलिस आरोग्य, नगरपंचायत, वीज आदी खात्यांमार्फत केंद्रातून वारकरी व भाविकांना योग्य ते मार्गदर्शन केले जात होते. संपूर्ण सुविधा दिल्या जात होत्या. दोन वर्षांनंतर दाखल झालेल्या माऊलींच्या सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. माऊलींच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, कोकण भागाबरोबाच संपूर्ण सातारा जिल्ह्यातील भाविक लोणंदला येत असतात, त्यामुळे भविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी तर रात्र – दिवस भविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पालखी तळ, खंडाळा रोड, गांधी चौक, नवी पेठ, शास्त्री चौकापासून एसटी स्टँडपर्यंत रांगा लागल्या होत्या.साधू संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा या उक्‍तीप्रमाणे लोणंदनगरवासीय लांब-लांबच पंगती जेवायला घालताना दिसत होते. माऊलींना नैवेद्य दाखवण्यासाठी बँड लावून वाजत
गाजत आणण्याची लोणंदवासियांची प्रथा आहे. त्यानुसार पालखी सोहळा आल्यापासून घराघरात, आळीत, वाडयात, पेठेत वारकर्‍यांच्या जेवणाच्या पंगती उठताना दिसत होत्या. आपल्या गावी संताचे वास्तव्य असल्याने प्रत्येकाच्या घरी जणू दसरा, दिवाळीच असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.लोणंदकरांच्या चेहर्‍यावर सात्विक आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. पंढरीच्या वाटेने नुसते ज्ञानोबा, तुकाराम म्हटले की कोणीच उपाशी रहात नाही. लोणंद नगरीतील अन्नदानाबाबत वारकरी समाजात आगळी वेगळी भावना आहे.
माऊलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावल्यापासून वरूण राजाने उघडीप दिली होती. त्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी सुखावला होता. लोणंदला दोन दिवस मुक्‍काम असल्याने पहिल्या मुक्‍कामानंतर वारकर्‍यांना विश्रांती मिळत असते. माऊलींच्या आगमनाने लोणंद नगरीतील सर्व रस्ते वारकरी, भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे लोणंदनगरीची पंढरी झाली होती. लोणंद नगरीतील दोन दिवसांच्या मुक्‍कामात वारकर्‍यांना मिळालेल्या सुविधांनी वारकरी सुखावला गेला होता.

Back to top button