सातारा जिल्ह्यात माऊलींच्या स्वागतासाठी सज्जता | पुढारी

सातारा जिल्ह्यात माऊलींच्या स्वागतासाठी सज्जता

लोणंद ; शशिकांत जाधव : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज मंगळवार दि. 28 रोजी दुपारी दोनच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील सहा मुक्‍कामांसाठी आगमन होणार आहे. माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. माऊलींच्या स्वागतापूर्वी निरा नदीपात्रात पाडेगाव बाजू तीरावर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे. निरा स्नानासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ढगाळ वातावरण असल्याने जलधारांच्या वर्षावातच माऊलींचे आगमन होणार असल्याची शक्यता आहे.

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, डीवायएसपी तानाजी बरडे, तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सपोनि विशाल वायकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माऊलींचा पालखी सोहळा निरा येथून दुपारी 1.30 च्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर निरा नदीवरील जुन्या पुलावरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. निरा नदीच्या पाडेगाव तीरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माऊलींच्या पादुकांना निरा नदीत निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येतील. शासनामार्फत तीर्थक्षेत्र आराखड्यातून दत्त घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये जुन्या पुलापासून घाटापर्यंत सिमेंटचा रस्ता, घाटावर पायर्‍या, निरा स्नानासाठी नदीत चबुतरा, लोखंडी बॅरिकेट, सभा मंडप, भक्ती निवास आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.दत्त घाटाच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत तर निरा नदीतील शेवाळ व अन्य घाण स्वच्छ करण्यात आली आहे.

निरा स्नानासाठी वीर धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आळंदीपासून निघालेल्या वारकर्‍यांना निरा नदीत चांगल्या प्रकारे आंघोळ करता येणार आहे. माऊलींना निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येत असताना भाविकांची मोठी गर्दी होते. घाटावर जाताना व निरा स्नान घालताना भाविकांच्या उत्साहाला आवर घालण्याचे काम पोलिसांना करावे लागते. निरा स्नानाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पादुकांना हातात नेण्यात येत असताना मार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

माऊलींचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव येथील जुन्या टोल नाक्याजवळ जिल्ह्याच्या वतीने अधिकारी व पदाधिकारी स्वागत करणार आहेत. या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांच्यावतीने दोरीचे कडे करण्यात येणार आहे. माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली असून माऊलींच्या आगमणाची प्रतिक्षा लागली आहे.

Back to top button