सातारा : पावसाळ्यात मिळेना प्यायला पाणी

सातारा : पावसाळ्यात मिळेना प्यायला पाणी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात जून महिना संपत आला असला तरी ऊन पडत आहे. पावसानेही हुलकावणी दिली असल्याने पाणी स्रोत आटू लागले आहेत. पेरण्या झाल्या नाहीत. पाण्याची काही ठिकाणी टंचाई जाणवत असून ऐन पावसाळ्यात माणसांना व जनावरांनाही प्यायला पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा, कराड या तालुक्यांतील 16 गावे व 37 वाड्यांमधील 17 हजार 742 नागरिक व 5 हजार 785 जनावरे तहानलेली असून सुमारे 11 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता. मात्र, दुसर्‍या आठवड्यापासून विविध गावांतून पिण्यासाठी टँकरची मागणी आली.

सातारा तालुक्यात 2 टँकर सुरू

सातारा तालुक्यातील जांभगाव, आवाडवाडी, निकमवाडी येथील 2 गावे 2 वाड्यांमधील 1 हजार 354 नागरिक व 340 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

माण तालुक्यात सहा हजार नागरिक टँकरवर भागवताहेत तहान

माण तालुक्यातील पाचवड गावठाण शिंगाडेवस्ती, गेंदवाडा, पांगरी गावठाण, स्टँड परिसर, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, पंदरकी, लांडगोबा, मोरदरा, लक्ष्मीनगर, तपासेवस्ती, जाधववस्ती, वाघाडी, लोखंडेवस्ती, चाफेमळा, धुळाची मळवी, गडदेवस्ती, बिजवडी गावठाण. वारुगड, मठवस्ती, खंड्याचीवाडी, गावदरा, उगळेवाडे असे मिळून 5 गावे व 26 वाडी वस्त्यांमधील 5 हजार 708 नागरिकांना 3 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वाईत जनावरांचाही पाण्यासाठी हंबरडा

वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंडेवाडी असे मिळून 3 गावे व 2 वाड्यांना येथील 4 हजार 14 नागरिक व 1 हजार 984 जनावरांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मुबलक पावसाच्या पाटणमध्येही टँकर सुरू

पाटण तालुक्यातील जंगलवाडी, जाधववाडी, चव्हाणवाडी,फडतरवाडी, घोट, आंब्रुळकरवाडी, भोसगाव या 4 वाड्यांमधील 1 हजार 759 नागरिक व 843 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

कराड तालुक्यात 2 टँकरद्वारे पुरवठा

कराड तालुक्यातील वानरवाडी, बामणवाडी जंगलवाडी (कोरीवळे) गावामधील 2 हजार 375 नागरिक व 1 हजार 516 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बालेकिल्ला व्याकूळ

जावली तालुक्यात खिलारमुरा, आखवडी मुरा, वारणेवस्ती, गवडी, म्हाते बु., भोगवली तर्फ मेढा येथील 3 गावे व 3 वाड्यामधील 2 हजार 532 नागरिक व 1 हजार 102 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून टँकरची मागणी

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र जलसंधारणाची कामे माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा यासह अन्य तालुक्यांत मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जमिनीमधील भूजल पातळीही स्थिर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता. मात्र, दुसर्‍या आठवड्यापासून विविध गावांतून पिण्यासाठी टँकरची मागणी आली. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत त्या-त्या गावांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर संबंधित गावांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत टँकर सुरू करण्यात आले. मात्र, जून महिना संपत आला असला तरी अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे.

34 ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत…

टँकर भरण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने पिंगळी बु., शिंदी खु, वाई, शिंदेवाडी, जिंती, खामगाव, कापडगाव, वाखरी, कोरेगाव, रेवलकरवाडी, नवलेवाडी, मांजरवाडी, डिस्कळ, निढळ, खटाव, संजयनगर शेरे, सह्याद्रीनगर, जवळेवाडी, मोरावळे, खामकरवाडी, तेटली या ठिकाणी विहिरी व विधंन विहिरी अधिग्रहीत केल्या असून या ठिकाणी टँकर भरले जात आहेत.

अनेक ठिकाणी पाणी स्रोत कोरडे पडू लागले….

पाण्याची टंचाई व टंंकरबाबतची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली. जून महिना निम्मा संपला तरीही पावसाने दडी मारल्याने पाणी स्रोत कोरडे पडू लागल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news