सातारा : ठसकेबाज लावण्यांवर थिरकल्या कस्तुरी

सातारा : ठसकेबाज लावण्यांवर थिरकल्या कस्तुरी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' कस्तुरी क्‍लबच्या वतीने महिला व युवतींसाठी आयोजित कलारत्न ग्रुपच्या 'ठसकेबाज लावण्यांचा नजराणा' या कार्यक्रमाला सातारकर महिलांनी टाळ्यांचा गजर करत आणि शिट्ट्यांचा अक्षरश: पाऊस पाडून जबरदस्त दाद दिली. दिलखेचक लावण्यांवर थिरकलेल्या कस्तुरींनी शाहू कला मंदिर डोक्यावर घेतले. दरम्यान, उपस्थित महिलांनी आकर्षक भेटवस्तू व सवलतीच्या कूपनची लयलूटही केली.

दै. 'पुढारी' कस्तुरी क्‍लबच्या वतीने महिला व युवतींसाठी' 'ठसकेबाज लावण्यांचा नजराणा' हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू कला मंदिराने कस्तुरी क्‍लब अणि महिलांच्या नात्याची वीण आणखी घट्ट केली. कलारत्न ग्रुपच्या अप्सरांनी हिंदी, मराठी गाण्यांवर ठसकेबाज लावण्या सादर केल्या.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर एकसोएक लावण्या सादर झाल्या. 'ओऽ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, तुम्हा वाचून करमत नाही, प्रितीच्या झुल्यामध्ये झुलवा, ओऽ आबा जरा सरकून बसा, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, चंद्रा, सामी श्रीवल्‍ली' या सारख्या लावण्यांवर महिलांनी रंगमंचावर येवून थिरकत अक्षरश: जल्लोष केला.

उत्कृष्ट संगीताच्या जोडीला नृत्यांगनांच्या दिलखेचक अदांनी शाहूकला मंदिरालाही घायाळ केले. उपस्थित महिलांनी एकच जल्लोष करत सभागृह दणाणून सोडले. सातारकरांची एवढी उत्स्फूर्त दाद मिळाल्यानंतर कलाकारांनीही एक से बढकर एक लावण्यांचे रंग कार्यक्रमात भरले.

या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक म्हसवडकर सराफ प्रा. लि. ज्वेलर्स हे होते. त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तूचे कूपन दिले. तसेच कस्तुरी सभासदांना सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत मजुरीवर 10 टक्के सवलतीचे कूपनही देण्यात आले. या कार्यक्रमास विश्रांती टुर्सचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य प्रायोजक म्हसवडकर सराफ प्रा. लि. ज्वेलर्सच्या दीपाली शहा, विश्रांती टुर्सचे रोहन वनारे व कलारत्न ग्रुपच्या कलाकारांचे स्वागत करण्यात आले.

दीपाली शहा म्हणाल्या, म्हसवडकर सराफ नवीन डिझाईन्स, उत्कृष्ट सेवा, पारदर्शक व्यवहार यासाठी सदैव तयार आहे. महिलांनी आपले गिफ्ट दुकानातून घेवून जावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दै. 'पुढारी'चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलींद भेडसगावकर व कस्तुरी क्लबच्या कमिटी मेंबर उपस्थित होत्या. प्रास्तविकात हरीष पाटणे यांनी कस्तुरी क्‍लबच्या वाटचालीचा आढावा घेताना महिलांनी बहुसंख्येने कस्तुरी क्‍लबमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news