सातारा : ग्रामीण तमाशा कलावंत पुरस्कारांपासून वंचित | पुढारी

सातारा : ग्रामीण तमाशा कलावंत पुरस्कारांपासून वंचित

उंडाळे ; पुढारी वृत्तसेवा : ज्यातील वृद्ध कलाकारांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार ग्रामीण भागातील (झाडाखालच्या) अर्धवेळ तमाशा कलावंतांना मिळत नसल्याची खंत राज्यातील ग्रामीण भागातील तमाशा कलावंतांमधून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून लोककला जिवंत राहावी, यासाठी झटणार्‍या कलावंतांना राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार देताना तमाशा कलावंतांना लोककला जपण्याची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांचे पुरस्कार अद्यापही देण्यात आलेले नाहीत. शासनाचे हे पुरस्कार देताना पुरस्कार कमिटी तोंड पाहून पुरस्कार देत असल्याची भावना ग्रामीण भागातील तमाशा कलावंतांमध्ये आहे. महाराष्ट्रात तमाशाच दोन प्रकारात मोडतात. तंबूतला तमाशा त्याला पूर्णवेळ तमाशा म्हटले जाते तर दुसरा झाडाखालचा तमाशा त्याला अर्धवेळ तमाशा म्हटले जाते. अशा दोन्ही तमाशांची संख्या राज्यात शंभरच्या आसपास आहे. लोककला जपण्यात दिलेल्या योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार दिला जातो. राज्य शासनाच्या वतीने स्व. विठाबाई भाऊ मांग जीवन गौरव पुरस्कार तसेच राज्य शासनाचाच सांस्कृतिक कला पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्‍कम तीन ते पाच लाखांपर्यंत आहे

तंबूतील तमाशाची संख्या दहा ते पंधरा एवढी आहे. परंतु झाडाखालच्या तमाशाची संख्या 75 च्या पुढे आहे. त्यामुळे अर्धवेळ तमाशाची संख्या अधिक असल्याने अर्धवेळ तमाशा चालकांना किंवा कलाकारांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळत नसल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. झाडाखालचे तमाशा कलावंत पुरस्कारापासून संचित राहत आहेत. त्यांचाही सन्मान होणे गरजेचे आहे.
शासनाच्या वतीने कलावंतांना मासिक मानधन दिले जाते; पण तेही वेळेत मिळत नाही. शिवाय मानधनाची रक्कमही तुटपुंजी आहे.

पुरस्कारासाठी विचारच नाही…

ग्रामीण भागातील तमाशा कलावंत ही कला जपत नाहीत काय अशी खंत मनव येथील तमाशा कलावंत व फड मालक महादेव मनवकर यांनी व्यक्‍त केली आहे. माझे वडील 90 वर्षांचे वृद्ध कलाकार आहेत. त्यांनी सबंध आयुष्य तमाशा कलेत वाहून घेतले आहे. वडिलांचा पुरस्कारासाठी अनेक वेळा शासनदरबारी प्रस्ताव पाठवूनही विचार झाला नाही.

Back to top button