सातारा : वासोटा पर्यटन प्रवेश शुल्कात वाढ

बामणोली : पुढारी वृत्तसेवा
ट्रेकर्स व पर्यटकांना भुरळ घालणार्या किल्ले वासोटा येथे येणार्या ट्रेकर्स व पर्यटकांना आता वाढीव पर्यटन शुल्क आकारणीचा फटका बसणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीत येणार्या सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना आता वाढीव प्रवेशशुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. शासनाने याबाबतचा आदेश काढला असल्याची माहिती बामणोली वन्यजीव कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.
शासनाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारे किल्ले वासोटा, चकदेव, महिमंडणगड येथे येणार्या पर्यटकांकडून पर्यटन शुल्काची वसुली करण्यात येते. महाराष्ट्र राज्य व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या सभेमध्ये पर्यटन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटन शुल्कामध्ये केलेली वाढ या वर्षापासून अंमलात येणार आहे.
केलेली शुल्कवाढ याप्रमाणे- जुना दर 12 वर्षांवरील प्रति व्यक्ती 30 रुपये, बदललेला दर 100 रुपये प्रति व्यक्ती, 12 वर्षांच्या आतील व्यक्ती जुना दर 15 रुपये, बदललेले दर 50 रुपये प्रति व्यक्ती, गाईड फी जुना दर 200 रुपये बदललेले दर 250 रुपये. बोट/वाहन शुल्क पूर्वी होते तेच 150 रुपये, कॅमेरा शुल्क- डीएसएलआर लेन्स कॅमेरा जुना दर 50 रुपये बदललेला दर 100 रुपये, साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेर्यास पूर्वी शुल्क नव्हते, आता 50 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. या वर्षापासून शुल्क वसुली करण्यात येईल, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वर्षाचा हंगाम 15 जून 2022 रोजी बंद करण्यात आला आहे. पुढील हंगाम 16 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे.