सातारा : पावसाअभावी शिवसागर जलाशयाने गाठला तळ | पुढारी

सातारा : पावसाअभावी शिवसागर जलाशयाने गाठला तळ

बामणोली ; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने बामणोली, तापोळ्याचा बोट व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. शिवसागर जलाशयावरच या भागातील शेकडो बोट चालक बोट व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. बामणोली, तापोळा, शेंबडी, मुनावळे परिसरात एकूण सहा बोटिंग संस्था कार्यरत असून या संस्थांच्या माध्यमातून वर्षाकाठी शेकडो बोट चालक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा रथ हाकत असतात.

मात्र, यावर्षी शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने बोटचालक हवालदिल झाले आहेत. बोट चालकांना आपल्या बोटी कोरड्या नदीपात्रात उभ्या करण्याची वेळ आली आहे. तापोळा ते खरोशी, रेनोशी, तापोळा ते गोगवे या दोन्ही बाजूच्या नदीपात्रात पाणी शिल्लक राहिलेले नाही. तर, बामणोलीपासून खाली भिंतीच्या बाजूला आंबवडे, कारगाव नजीक नदीपात्रामध्ये होड्या चालतील एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

ज्या भागात पाणीसाठा बर्‍यापैकी आहे तेथे या भागातील स्थानिक नागरिकांना ना बोटिंगची परवानगी ना मासेमारी करण्याची. कुसावडे, मालदेव ते कोयना धरणाची भिंत या भागात नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर कोरड्या नदीपात्रात उभ्या केलेल्या बोटी प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्यासाठी बोट चालकांनी गडबड सुरू केली आहे. बोट चालकांचेही डोळे आभाळाकडे लागले आहेत.

बोट व्यवसायाला जोड धंदा म्हणून बर्‍याच बोट चालकांनी हॉटेल, टेन्ट, अ‍ॅग्रो टुरिझम असे व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, बोटिंग पूर्णपणे बंद असल्याने हे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

Back to top button