मराठी चित्रपटास सिनेमागृह मिळणे गरजेचे : मकरंद अनासपुरे | पुढारी

मराठी चित्रपटास सिनेमागृह मिळणे गरजेचे : मकरंद अनासपुरे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : आज महाराष्ट्रात पाहिलं तर मराठी चित्रपटांचे आशय, मांडणी, कथा उत्तम व दर्जेदार असते. तरी देखील बहुतांश मराठी चित्रपटांना अद्यापही चांगले दिवस दिसत नाहीत. याला कारण म्हणजे आज आपल्याकडे मराठी हक्‍काची सिनेमागृहेच नाहीत. त्यामुळे मराठीला सिनेमागृहे मिळणे काळाची गरज आहे. मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळाल्यास निश्‍चितच या चित्रपटांनाही ऊर्जीतावस्था मिळू शकते, असे मत अभितेने मकरंद अनासपुरे यांनी व्यक्‍त केले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे तिसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन समारोपप्रसंगी कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास, नाम फाऊंडेशनचे काम, चित्रपटातील पदार्पण आदी विविध विषयांवर त्यांना बोलते केले. त्यावेळी त्यांनीही आपल्या जीवनाचे एकएक पैलू उलघडले.

मकरंद अनासपुरे म्हणाले, वयाच्या तिसर्‍या, चौथ्या वर्षापासून मी अभियानाला सुरुवात केली. वडीलांची सरकारी नोकरी असल्यामुळे फिरता प्रवास असे, या क्षेत्रात आल्यानंतर आप्पासाहेब जिंदाबाद हे माझे नाटक होते. याच दरम्यान पुढे पाचवीपासून बीडला जावे लागले. बीडला पाचवीत आल्यानंतर बालनाट्य खूप केली. त्यानंतर व्यावसायिक नाटकाला सुरुवात केली होती.

पदवीचे शिक्षण औरंगाबाद या ठिकाणी घेताना अभिनय फुलत जाऊन एकूण 500 नाटके केली. एकांकी स्पर्धेत काम करु लागलो. त्यावेळी पहिले बक्षिस मिळाल्यानंतर नाना पाटेकर यांनी सांगितले तू मुंबईला ये रे एकदा अन पुढे 1994 मध्ये मुंबईत आलो. येथे आल्यानंतर सुरुवातीला आमदार निवासात राहत होतो. त्याठिकाणी अनेक अडथळे आल्याने आमदार निवासाने आयुष्य कसं असतं ते शिकवले. दिग्दर्शन हा व्यवसाय म्हणून करत नाही तर आवड म्हणून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांसाठी नाम फाऊंडेशनची चळवळ…

शेतकरी बांधवांसाठी नाम फाऊंडेशनची चळवळ नाना पाटेकर यांच्या माध्यमातून उभी केली. यामुळे गेल्या साडेसात वर्षांपासून नामचे काम चांगले सुरू आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी एकूण साडे सहा टीएमसी पाणी अडवून त्या ठिकाणचा परिसर हिरवागार करण्यात यश आले असल्याचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

Back to top button