कराड : कोयनेवर आणखी दोन नवे पूल | पुढारी

कराड : कोयनेवर आणखी दोन नवे पूल

कराड ; पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या दरम्यानच्या पेठनाका (जि. सांगली) ते शेंद्रे (सातारा) या 67 किलोमीटरच्या सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर 2022 नंतर सुरू होणार आहे. कराडजवळील कोयना नदीवर आणखी दोन नवे पूल होणार आहेत. तर पंकज हॉटेल ते मलकापूरमधील ग्रीन लॅण्ड हॉटेल या दरम्यान तब्बल साडेतीन किलोमीटरचा नवीन उड्डाण पूल होणार असून, सध्यस्थितीत अस्तित्वात असलेले या दरम्यानचे उड्डाण पूल पाडण्यात येणार आहेत.

पेठनाका ते शेंद्रे या दरम्यान होणार्‍या सहापदरीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्र सरकार आणि संबंधित ठेकदार कंपनी यांच्यात करार तसेच अन्य कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

ठेकेदार कंपनीकडून ड्रोनद्वारे सर्व्हेचे कामही पूर्ण झाले आहे. याशिवाय अन्य सर्व्हे आणि पर्यावरण संबंधी कामास परवानगी मिळवण्याचे काम सुरू आहे.

कराड शहराचे प्रवेशद्वार असणार्‍या कोल्हापूर नाका येथे वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच या ठिकाणी कराड – मलकापूर जंक्शन दरम्यान 29.5 किलोमीटर रूंदीचा आणि 5.5 मीटर उंचीचा सिंगल कॉलमवर आधारित उड्डाण पूल होणार आहे. हा उड्डाण पूल जवळपास साडेतीन किलोमीटरचा असणार आहे.

हा उड्डाण पूल 29.5 मीटर रूंद, 3.47 मीटर लांब 115 पिलरवर आधारित असणार आहे. तसेच 7.5 मीटर रूंदीचे व 3.470 किलोमीटर लांबीचे सर्व्हिस रोड होणार असून उड्डाण पुलाखाली 7 मीटर रूंदीचे 3.4 किलोमीटर लांबीचे स्लिप रोड दोन्ही बाजूला होणार आहेत.
कराडजवळ कोयना नदीवर 17 मीटर रूंद व 213 मीटर लांबीचा नवीन अतिरिक्त 3 लेनचा नवा पूल होणार आहे. याशिवाय याच ठिकाणी 11 मीटर रूंदीचा नवीन सर्व्हिस रोडसाठी आणखी एक पूल बांधण्यात येणार आहे. याशिवाय उरमोडी नदीवरही नागठाणे येथे एक नवीन मोठा पूल बांधण्यात येणार आहे. कराड शहरासह इतर तीन ठिकाणी ग्रेड सेपरेटर उड्डाण पूल होणार आहेत. 13 ठिकाणी मायनर ब्रीज होणार असून वाठार, पाचवड, वारूंजी फाटा व पंढरपूर फाटा या 4 ठिकाणी ग्रेड जंक्शन होणार आहे.

वारूंजी व खोदड येथे ट्रक थांबे होणार आहेत. नांदलापूर आणि वारूंजी फाटा येथे बसथांबा होणार आहे. याशिवाय लहान – मोठे अंडरपास, सर्व्हिस रोड ब्रीज, मायनर जंक्शन, सर्व्हिस रोड कलव्हर्ट मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने महामार्गावरील वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

* कराड-नागठाणेजवळ दोन नवे मोठे पूल होणार                                                                                                                   * दोन नवे मोठे पूल होणार
* वाठार, पाचवड, वारुंजी फाटा येथे ग्रेड जंक्शन
* कोयना नदीवर सर्व्हिस रस्त्यासाठी स्वतंत्र पूल
* पेठ नाका ते शेंद्रे दरम्यान 24 ठिकाणी बसथांबे
* कोल्हापूर नाका ते ग्रीनलँड हॉटेल दरम्यान सिंगल कॉलमवर आधारित 115 पिलरचा उड्डाणपूल.
* तासवडे टोलनाक्यावर होणार तब्बल 24 लेन

Back to top button