‘एमपीएससी’ची सर्व माहिती अ‍ॅपवर | पुढारी

‘एमपीएससी’ची सर्व माहिती अ‍ॅपवर

सातारा; मीना शिंदे : स्पर्धा परीक्षार्थींची संख्या वाढत असून या उमेदवारांच्या सोयीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामुळे एमपीएससीच्या पदभरती जाहिरातीपासून ते निकालापर्यंतची सर्व माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

एमपीएससीतर्फे होणार्‍या सर्व परीक्षांचे अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्र जमा करण्याबरोबरच परीक्षा शुल्कही ऑनलाईनच भरले जाते. हॉल तिकीट, अ‍ॅन्सर की, परीक्षेचा निकाल ही प्रक्रिया ऑनलाईनच होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो. सध्याचे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईड यंत्रणेसाठी असून आयएस प्रणालीसाठीचे अ‍ॅप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये सर्चबारवर ‘एमपीएससी अ‍ॅप इन मराठी’ टाईप करून सर्च करून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

सिलॅबस : सिलॅबस आयकॉनवर क्लिक केल्यावर एखाद्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय आहे, याची माहिती मिळते. त्यातून अभ्यासासाठी योग्य दिशादर्शन होत आहे.

अनाऊन्समेंट अ‍ॅण्ड सर्क्युलर : अनाऊन्समेंट अँड सर्क्युलर या आयकॉनमध्ये नव्या जाहिराती, त्याची लिंक याची माहिती आहे. विविध पदांच्या भरतींबाबतची परिपत्रके, जाहिरात क्रमांक, ही माहिती यात आहे.

अ‍ॅडव्हरटाईजमेंट/नोटीफिकेशन : अ‍ॅपमधील व्हरटाईजमेंट/नोटीफिकेशन या आयकॉनमध्ये आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या विविध परीक्षा व पदभरतींबाबतच्या जाहिरातींच्या तारखेसह फाईलच्या लिंक दिल्या आहेत. शासनाचे गॅझेट, नॉन गॅझेट, मुख्य परीक्षेची तारीख आदी माहिती मिळत आहे.

प्रीव्हीअस क्वशन पेपर : या आयकॉनमध्ये यापूर्वीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व त्यांच्या लिंक आहेत. त्याचा जाहिरात क्रमांकही आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोडही करता येईल.

शेड्युल : शेड्युल या आयकॉनमध्ये टेंटेटीव्ह शेड्युल ऑफ कॉम्पिटिटीव्ह एक्झामस्, करंट स्टेटस ऑफ कॉम्पिटिटीव्ह एक्झामस्, शेड्युल फॉर इंटरव्ह्युवज, शेड्युल फॉर फीजिक्स टेस्ट हे आयकॉन आहेत. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित विषयाची माहिती मिळू शकते.

अ‍ॅन्सर की : या आयकॉनवर क्लिक केल्यावर विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका पाहता येईल. आपल्या उत्तरांची पडताळणी होऊ शकते.

रिझल्ट : रिझल्ट या आयकॉनवर आयोगाच्या विविध परीक्षांचा निकाल, मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची यादी, मुलाखत व थेट पदभरती मिळणार्‍यांची यादी, त्या-त्या परीक्षेची गुणवत्ता यादी, अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी असे आयकॉन्स् आहेत.

या मागण्यांकडेही आयोगाने द्यावे लक्ष

उमेदवारांनी पाठवलेल्या ईमेल्सना आयोगाकडून लवकर उत्तर दिले जात नाही. कॉल सेंटरकडून व्यवस्थित माहितीही दिली जात नाही. तक्रारींबाबत कार्यवाहीची माहिती उमेदवारांना मिळायला हवी. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी अपेक्षा उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.

Back to top button