सातारा : अंगणवाड्यांमध्ये घुमणार टाळमृदुंगाचा गजर | पुढारी

सातारा : अंगणवाड्यांमध्ये घुमणार टाळमृदुंगाचा गजर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि.28 जून ते 4 जुलै असा मार्गक्रमण करणार आहे. या सोहळ्यावेळी पालखी मार्गावरील अंगणवाड्यांमध्ये टाळमृदुंगाचा गजर घुमणार आहे. या अंगणवाड्यांमध्ये पायी येणार्‍या वारकर्‍यांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. खंडाळा व फलटण तालुक्यातील वारी मार्गावरील सुमारे 70 हून अधिक अंगणवाड्यांमध्ये वारकर्‍यांचा मुक्काम राहणार आहे.

राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानुसार पालखी सोहळ्यात आलेल्या वारकर्‍यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच विविध उपाययोजनांची अमंलबजावणी विविध विभागामार्फत करण्यात येत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खंडाळा व फलटण तालुक्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली.

पालखी मार्गावर खंडाळा तालुक्यात लोणंद, बिरोबावस्ती, इंदिरानगर, लोणंद सोसायटी, माऊलीनगर, दगडवस्ती, भंडलकरवस्ती, खोतमळा, ठोंबरेवस्ती, लोणंद जि. प. शाळा, दत्तनगर, बाजारतळ, चोपनवस्ती, शेळकेवस्ती, वडारवस्ती, झारेकरीवस्ती, समाज मंदिर, बाळासोनगर, अहिल्यानगर, काळवट, कुरणवस्ती, भिसेवस्ती, बिरोबा कॉलनी, भवानीनगर, सुंदरनगर अशा 27 ठिकाणी तर फलटण तालुक्यात पालखी मार्गावरील कापडगाव, बेघरवस्ती, तरडगाव, काळज, सावळा-पाटील मळा, मुकदम मळा, सुरवडी, निंभोरे, चौंडेवस्ती, वडजल, धुळदेव, भिवरकरवाडी, लिपारेवस्ती, विठ्ठलबाबानगर, विडणी, पिंपरद, निंबळक, बरड अशा 43 अंगणवाड्यांमध्ये वारकर्‍यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रातील निवासाच्या ठिकाणी शौचालय सुविधा, हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला मदत व मार्गदर्शन कक्ष, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना प्रसिध्दी, महिला मदत हेल्प लाईनची सुविधा करण्यात आली आहे. तसेच महिला बचत गटांच्या सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकीन विक्रीचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती रोहिणी ढवळे यांनी दिली.

Back to top button