सातारा : सिव्हिल बनलंय यंत्रचोरीचा अड्डा | पुढारी

सातारा : सिव्हिल बनलंय यंत्रचोरीचा अड्डा

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सिव्हिल रुग्णालय जणू काही यंत्र चोरीचा नवीन अड्डा बनू लागले आहे.रूग्णांसाठी महत्वाच्या असणार्‍या यंत्राची राजरोसपणे चोरी होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा धूळ खात पडल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढच झाली आहे. यावर रूग्णालय प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चोरट्यांचे फावत आहे. रूग्णालयातील काही महाभागांचा यामध्ये हात असल्याची शंका बळावू लागली असून कुंपनच शेत खातंय असा प्रकार सिव्हिलच्या बाबतीत घडत आहे.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशी व्यवस्था आरोग्य विभागाने निर्माण केली आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सुविधा, शस्त्रक्रिया, गंभीर आजारांवरील उपचार यासाठी जिल्हा रुग्णालयाचा सर्वसामान्यांना आधार असतो. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून नागरिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात.

दोन वर्षांपूर्वी आरोग्य सुविधांमधील कमतरता प्रशासन व शासनाला प्रकर्षाने जाणवल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कायापालट म्हणता येईल, अशा पद्धतीचे आमूलाग्र बदल करण्यात आले. सहा बेडच्या अतिदक्षता विभागाची व्यवस्था असताना जिल्हा रुग्णालयात नव्याने 40 बेडचे अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले. त्यामुळे सहाजिकच या विभागात लागणार्‍या अत्यावश्यक यंत्रणाही आल्या. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांतशस्त्रक्रियागृहाचेही नूतनीकरण झाले.

जिल्हा रुग्णालयात सुविधा वाढल्यामुळे नागरिकांनाही त्याचा लाभ मिळू लागला आहे. परंतु, नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या यंत्रणांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी ही जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाची आहे. परंतु, त्याचे पुरेसे गांभीर्य रुग्णालय व्यवस्थापनाला असल्याचे दिसून येत नाही. रुग्णालयात राजरोसपणे चोरीचे प्रकार वाढले आहेत. परिसरातून दुचाकी चोर्‍या तर वाढल्या होत्याच. काही वेळा केसपेपर विभागातून पैशाचीही चोरी झाली. एक्सरे मशिन सातार्‍यातून कुठे गेले? कसे गेले? याचा थांगपत्ता प्रशासनाला नव्हता. त्याबाबत ठोस कारवाया झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील काही महाभागांचे चांगलेच फावले आहे. गेल्या काही दिवसांत मॉनिटर घेऊन जात असल्याचाही प्रकार समोर आला.

शस्त्रक्रियागृहातून यंत्र गायब झाले. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा रक्षक करतात काय? असा प्रश्न उपस्थित होतो. या चोर्‍यांना काहींचा हातभार आहे का? अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात समोर आलेल्या प्रकारांपेक्षा कितीतरी छोट्या-मोठ्या वस्तू गायब होत आहेत. अगदी जिल्हा शल्यचिकित्सकांचे शिक्केगायब झाल्याची बाब दुसर्‍या विभागाने निदर्शनास आणून दिल्याशिवाय समजली नाही याला काय म्हणायचे? काही प्रकारांबाबत रुग्णालय प्रशासनाकडे लेखी म्हणणे गेले आहे. परंतु, त्यावर आजवर का कारवाई झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button