जावलीच्या माजी आमदारांनी बोगस पाणी योजना राबवल्या : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

जावलीच्या माजी आमदारांनी बोगस पाणी योजना राबवल्या : आ. शिवेंद्रराजे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जावली तालुक्यातील विविध गावांमध्ये माजी आमदारांनी बोगस प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबवल्या होत्या. पाईपलाईन आहे तर मोटार नाही, मोटार आहे तर टाकी नाही अशा योजना माजी आमदारांनी जावलीकरांच्या माथी मारल्या होत्या. मला असल्या राजकारणात पडायचं नाही, मला जावलीकरांचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे, असा निर्धार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरण प्रकल्प संदर्भाने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करून सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, असा इशारा आ. शिवेंद्रराजेंनी दिला होता. त्यावर अजितदादांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. जिल्हा प्रशासनाने ना. अजित पवार यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प पूर्ण करणार आहे. बैठकीत धरणासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण करून घ्यावे.

सर्व्हेक्षणासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा. निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना ना. अजित पवार यांनी केल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

या प्रश्नावर सर्वसमावेशक तोडगा काढून आणि सर्वांना बरोबर घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलनही केले होते. ना. पवार यांच्या सहकार्यातून या प्रकल्पाला मंजुरीही मिळवली होती. आता या प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक झाली आहे. ना. पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी. काहीही झाले तरी जनतेच्या हितासाठी हा प्रकल्प आपण मार्गी लावणारच असल्याचा निर्धारही आ. शिवेंद्रराजेंनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

Back to top button