लोकप्रतिनिधीच जर खंडणीखोरांना पाठीशी घालत असतील तर जनतेचं काय होणार? – ना. अजित पवार | पुढारी

लोकप्रतिनिधीच जर खंडणीखोरांना पाठीशी घालत असतील तर जनतेचं काय होणार? - ना. अजित पवार

म्हसवड : पुढारी वृत्तसेवा
सातार्‍यामध्ये एमआयडीसीत अनेक उद्योग बंद पडायला लागले आहेत. सातार्‍यामध्ये कोणती मोठी इंडस्ट्री यायला तयार आहे का? काहीजण कॉन्ट्रॅक्टमध्ये इंटरेस्ट दाखवतात, तर काहीजण वाळूमध्ये इंटरेस्ट दाखवतात. कुठं टोलनाका चालवणारे म्हणून स्वत:ला मिरवतात. खंडणीखोरांना पाठीशी घालण्याचे काम करतात. अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी वागत असतील तर तर त्या जनतेचं काय होणार आहे? मतदारांचे काय होणार आहे? असा सवाल उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी वरकुटे-मलवडी येथील जाहीर सभेत केला.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार रविवारी माण तालुक्याच्या दौर्‍यावर होते. वरकुटे-मलवडी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना लोकप्रतिनिधी व एमआयडीसीतील खंडणीखोरांवरही झोड उठवली.

ना. अजित पवार म्हणाले, सातार्‍यामध्ये एमआयडीसीत अनेक उद्योग बंद पडायला लागले आहेत. कारण काय, याचा जरा शांतपणे विचार करा. सातार्‍यामध्ये कोणती मोठी इंडस्ट्री यायला तयार आहे का? चांगल्या पद्धतीचा सहापदरी हायवे झाला आहे, मुबलक पाणी आहे, धरणं आहेत. या सगळ्याचा विचार होणार आहे की नाही? आम्ही कुणाला निवडून देतोय याचा विचार करा. काहीजण म्हणतात, पुढचा आमदार मीच होणार, यांच्या घरची पेंड आहे का? घटनेने, संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे. कुणाला निवडून द्यायचं, कुणाला बाजूला करायचं एवढी जबरदस्त ताकद तुमच्या मतामध्ये आहे.

सातारा जिल्ह्यात, माण-खटाव तालुक्यांत बरीच कामे करायची आहेत. पुण्यामध्ये उद्योगांच्या विकासकामांत कोण आड आलं तर आम्ही तो जवळचा आहे की लांबचा, हे बघत नाही. वातावरण चांगलं असलं पाहिजे. उद्योगपतींनाही सुरक्षित वाटलं पाहिजे. आपलेपणाची भावना पाहिजे. दुर्दैवाने काही जिल्ह्यात असे वातावरण नाही. सातार्‍यात कॉन्ट्रॅक्टरला ताप दिला जातो. लोकप्रतिनिधींच्या नावावर काही चुकीचं होत असेल तर तेही खपवून घेवू नका, असे ना. अजित पवार म्हणाले.

सोम्या-गोम्याला महत्त्व देत नाही…

मी कुठल्याही सोम्या-गोम्याच्या ट्विटला महत्त्व देत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

कधीतरी खरं बोलायला शिका…

ना. अजित पवार यांनी जाहीर सभेत सातारा एमआयडीसीतील खंडणीबाबत केलेल्या वक्‍तव्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना आणखी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजितदादांनी काही प्रश्‍नांना बगल दिली, तर काही प्रश्‍नांवर मिश्किल भाष्य केले. सातारच्या एमआयडीसीमधील खंडणीबाबत तुम्हाला माहिती नाही का? कधीतरी खरं बोलायला शिका, असेही ते म्हणाले.

Back to top button