खटावमध्ये चिकुनगुनियाचे चार रुग्ण | पुढारी

खटावमध्ये चिकुनगुनियाचे चार रुग्ण

खटाव : पुढारी वृत्तसेवा : खटावमध्ये चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत तर सर्वत्र निर्जंतुकीकरण फवारणी सुरु करण्यात आली आहे. गावकर्‍यांनी स्वच्छतेबरोबरच कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खटावमध्ये ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे असणारे रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णालयांमध्ये चिकुनगुनिया आणि डेंग्यूसदृश्य लक्षणे असणार्‍या रुग्णांची गर्दी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासणी करण्यात आलेल्यांपैकी चार रुग्णांना चिकुनगुनिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गावात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख म्हणाले, खटावमध्ये अगोदरही आणि आता चिकुनगुनियाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य कर्मचार्‍यांकडून सर्वेक्षण सुरु आहे. पाणीसाठे रिकामे करणे किंवा त्यात आळीनाशक औषध टाकणे, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, गावकर्‍यांना आरोग्य शिक्षण देणे, घरोघरी पाणीसाठ्यांची तपासणी करणे अशा उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. निर्जंतुकीकरण फवारणी करताना औषधाचे प्रमाण योग्य ठेवण्याच्या सुचना सर्वच ग्रामपंचायतींना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button