

कराड : पुढारी वृत्तसेवा : कराड शहर व परिसरात शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत धडक मोहिम राबवली. गत महिनाभरात पोलिसांकडून शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नंबरप्लेट नसलेल्या व फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या दुचाकींना टार्गेट करत पोलिसांनी कारवाई केली. गेली अनेक दिवसांपासून शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिणे हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या पार्श्वभुमीवर वाढलेली गुन्हेगिरी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ही मोहिम सुरु केली आहे.
कराड शहरासह विद्यानगर, मलकापूर तसेच अनेक ठिकाणी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या सुचनेनुसार व वाहतुक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरु आहे. यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार कृष्णा कॅनॉल, कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल चौक, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसरात, दत्त चौक, शंभूतीर्थ चौक, पोपटभाई चौक, कोल्हापूर नाका, मलकापूर फाटा, ढेबेवाडी फाटा, विद्यानगर, वारुंजी फाटा यासह विविध ठिकाणी गत महिनाभरात पोलिसांनी कारवाई मोहिम राबवली.
या मोहिमेमध्ये वाहनधारकांना अडवून वाहन चालवण्याच्या परवान्यांची खातरजमा केली जात होती. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत किंवा नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. गत महिनाभर शेकडो वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळेया कारवाईची सर्वत्र चर्चा सुरु असून वाहनधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.