सातार्‍यात 5 लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

सातार्‍यात 5 लाखांचा गुटखा जप्त

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात गुटख्याची राजरोसपणे खरेदी-विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) 4 लाख 95 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल झाला असून गोडोलीतील या कारवाईने खळबळ उडाली आहे. गणेश बबन यादव (वय 38, रा. गोडोली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही कारवाई दि. 8 रोजी पालवी चौक, गोडोली येथे करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी गुटखा विक्री होत असल्याने पोलिस अधीक्षक यांनी कारवाईची सूचना केली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाला गोडोली परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला.

यावेळी विविध गुटख्यांचा साठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये चार ते पाच प्रकारचे पान मसाला, गुटखा होता. पोलिसांनी याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनाला दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला असता तो गुटखा 5 लाख रुपयांचा असल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी गुटख्यावर रेड टाकल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे पोलिस हवालदार संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मोहसिन मोमीन, वैभव सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button