सातारा : जिल्हा रुग्णालयात चमकोंचा उच्छाद | पुढारी

सातारा : जिल्हा रुग्णालयात चमकोंचा उच्छाद

सातारा : पुढारी वृत्तसेवा
गोरगरिबांचे आरोग्य मंदिर असलेले सिव्हिल हॉस्पिटल उपचाराऐवजी आता काही जणांसाठी पैसे कमवण्याचे केंद्र बनू लागले आहे. काही चमकोंनी रुग्णालयात उच्छाद मांडला असून रुग्ण, डॉक्टर व कर्मचार्‍यांचीही पिळवणूक होऊ लागली आहे. समाजसेवा करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा जोमात सुरू असून सिव्हिलमधीलही काही जणांना चिरीमिरीसाठी खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.

वैद्यकीय उपचार हे सर्वसामान्यां-पासून मध्यमवर्गीयांना न परवडणारी बाब आहे. यामुळे गोरगरीब उपचारासाठी सिव्हिलमध्ये जातात. वास्तविक सिव्हिल प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून कात टाकल्याने उपचार, स्वच्छता यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. याचा फायदा गोरगरीब जनतेला होत असताना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला मिळाल्यानंतर ते गांगरून जातात. यामुळे गावपातळीवर ते स्थानिक नेत्याला साकडे घालतात. तेथून काही डाळ शिजत नसली की सिव्हिलमधील काम करून देतो, असे सांगून काही जणांनी दुकानदारी मांडली आहे. अशा अपप्रवृत्तीच्या जाळ्यात रुग्ण, नातेवाईक सापडत आहेत. या सर्व प्रक्रियेत हाल होऊन पैसा, वेळ वाया जात आहे.

काही बहाद्दर थेट आपण या संघटनेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आहे, संघटक आहे असे सांगून सिव्हिलची यंत्रणा वेठीस धरत आहेत. सिव्हिलकडून अशा बिनडोकांची अनेकदा खातरजमा केली जात नाही. त्यातूनच अशा महाभागांची दुकानदारी सुरू होते. सिव्हिल प्रशासनामधील काही महाभाग यात सामील आहेत.राजकीय नेत्याचा आपल्याला सपोर्ट असल्याचा आभास तयार केला जातो. याचबरोबर माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढून व विविध गैरसोयी असल्याचा बहाणा करून बर्‍याच जणांनी सेटलमेंटचा धंदा सुरू केला आहे. नेत्यांच्या नावाखाली काहीजणांचे उद्योग मध्यस्थी करणार्‍यांकडून कारणे सांगून स्वत:चे महत्त्व वाढवले जात आहे. यातूनच सिव्हिलला बदनाम करण्याचा उद्योग केला जात आहे. अनेकदा किरकोळ कामासाठी वजनदार लोकांचे नाव सांगून टोळी आपले ईप्सित साध्य करत आहे. अनेकदा वजनदार नेत्याला त्याचा मागमूसही माहीत नसतो. मात्र अशा पंटरांना सिव्हिलचे प्रशासनही दबकते व गरीब रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होतो. नियमांची पायमल्ली होते व अनागोंदी त्यातूनच वाढते. आपला खिसा गरम करण्याचे धंदे हे चमको करत असून त्यांचा जिल्हा रुग्णालयात सुळसुळाट सुरू आहे.

Back to top button