मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्याला झोडपले : ठिकठिकाणी पडझड

मेढा-कुडाळ रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडामुळे वाहतूक खोळंबली होती.
मेढा-कुडाळ रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडामुळे वाहतूक खोळंबली होती.
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे पाऊणतास सातारा शहराला जोरदार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातीरपीट उडाली.

मे महिन्यापासून राज्यासह देशात चांगला पाऊस होईल, जूनमध्ये मान्सून सक्रिय होईल, लवकरच पावसाळा सुरु होईल हे हवामान खात्याचे अंदाज फोल ठरल्याने नागरिकांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. बुधवारी दुपारी 3 वा.च्या सुमारास सातारा शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

भाजी विक्रेत, फिरते व्यावसायिक व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊणतास पाऊस सुरु राहिल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाही संरक्षणासाठी मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला. मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व फळबागांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस व वार्‍यामुळे फळबांगांचे नुकसान झाले.

मोळमध्ये वीज पडून म्हैस ठार

खटाव; पुढारी वृत्तसेवा : मोळ, ता. खटाव येथे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता वीज पडून भरत वसंत घाडगे यांची म्हैस ठार झाली. परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने शेतीचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. परवा झालेल्या पावसातही बुध परिसरात शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. बुधवारी दुपारीही वादळी वारे वीजांच्या कडकडाटासह मोळ परिसरात जोरदार पाऊस झाला. वीज पडून भरत घाडगे यांची शेडमध्ये बांधलेली म्हैस ठार झाली. तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

जावलीत वाहतुकीवर परिणाम

मेढा; पुढारी वृत्तसेवा : जावली तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने झाडे व विजेचे पोल उन्मळून पडले.

जावली तालुक्यातील कुडाळ, सरताळे, करदोंशी, भिवडी, करंदी तर्फ कुडाळ येथे वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वार्‍यामुळे मेढा पाचवड रस्त्यावर झाडे मोठ्या प्रमाणात पडली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती.

अनेक ठिकाणी शेताच्या बाजूने झाडे अर्धवट मोडून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे शेतांमधून पाणी मोठया प्रमाणात साचले आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला. आलेवाडी, दरे,करंदोशी गावच्या रस्त्यालगत खूप जूनी झाडे असून ती पडण्याच्या स्थितीत आहेत. ती तातडीने हटवावीत अशी मागणी होत आहे.

माण-कोरेगावमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस : मालमत्तेचे नुकसान

दहिवडी; पुढारी वृत्तसेवा : माण तालुक्यातील बहुतांशी गावात बुधवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे दहिवडी, वडगाव, कुकुडवाडसह अनेक गावात घराचे पत्रे उडाले. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच वादळी वार्‍यामुळे फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महेश जगदाळे यांच्या कारवर झाड पडून गाडीचे नुकसान झाले आहे. वीजेचे पोलही काही ठिकाणी कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत होता.

दहिवडीसह परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने बुधवारी दुपारी धुमाकूळ घातला. तालुक्यात अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस झाला मात्र वादळी वारा प्रचंड असल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले. दहिवडी येथील मोरेमळ्यातील भरत पवार यांच्या घराचे छप्पर उडाल्याने पूर्ण संसार उघड्यावर आला. तसेच वडगाव येथील संग्राम विठ्ठल ओंबसे यांच्याही घराचा पत्रा उडाला, कुकुडवाड येथील राजेंद्र नारायण काटकर यांच्या घराचे पत्रा शेड उडून विद्युत तारांवर पडले. बिदाल येथे जिल्हा बँकेच्या समोरील मोठे झाड उन्मळून पडले. दहिवडी-पिंगळी रस्त्यावर तसेच बिदाल, गोंदवले रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प होती. दरम्यान, फलटण चौकातील भाजी विक्रेत्यांचे छत, अनेक दुकानाचे बोर्ड वार्‍यामुळे तुटून पडले. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने तालुक्यातील सर्वच विद्युत पुरवठा खंडित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news