सातारा : कराड विमानतळासाठी 221.51 कोटींचा निधी

सातारा : कराड विमानतळासाठी 221.51 कोटींचा निधी
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून आलेल्या प्रस्तावाला मान्यता देत 221.51 कोटीं निधी मंजूर केला. यात 45.82 हेक्टर अतिरिक्त जमीन संपादनासह प्रकल्पबाधित घरांची किंमत, पुनर्वसनासाठी जमीन संपादन करणे, पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे स्थलांतर करणे, विमानतळावरील आवश्यक सुविधा निर्माण करणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री आम. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात आवाज उठविला होता.

माजी मुख्यमंत्री आम. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना कराड विमानतळ विस्तारवाढीसाठी मान्यता दिली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट 2012 ला 95.64 कोटींचा निधीही मंजूर केला होता. मात्र, विमानतळ विस्तारवाढीवरून वारूंजीसह परिसरातील गावांत मतप्रवाह पहावयास मिळाले होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनही उभारण्यात येऊन विमानतळ विस्तारवाढीस विरोध करण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने कराड विमानतळ विस्तारवाढ व विकास हा विषय सातत्याने चर्चेत असतो. याच पार्श्वभूमीवर राज्या शासनाने आता कराड विमानतळाच्या विकासासाठी सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.

विमानतळ विकास कंपनीकडून सादर करण्यात आलेला 221.51 कोटींचा प्रस्ताव 20 ऑक्टोंबरला राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. याच बैठकीत प्रस्तावास मान्यता देण्यात आल्यानंतर बुधवार, 29 नोव्हेंबरला शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आल्याचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार विमानतळाच्या अतिरिक्त जमीन संपादनासह प्रांताधिकारी कार्यालयाच्या अस्थापन खर्चासाठी 89.71 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यात प्रकल्पबाधितांच्या घरांची किंमतही समाविष्ट आहे. प्रकल्पबाधितांच्या घरांच्या पुनर्वसनाच्या जागी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी 7.12 कोटी, प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाकरिता 2.90 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार असून त्यासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

बाधित शेतकर्‍यांच्या पुनर्वसन पॅकेजकरिता 11.53 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय धावपट्टी, टर्मिनस बिल्डींग, एटीसी टॉवर, फायर फायटिंग यंत्रणेसाठी 10.91 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय जमीन सपाटीकरण, संरक्षक भिंत व नाले यासाठी 14.59 कोटी, भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी 8.50 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासह अन्य कामांसाठी 29.42 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news