

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड पंचायत समितीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सत्ता एकहाती कोणाच्यात हाती राहिली नाही. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व आता राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेवर राहिला आहे. गट, गण पुनर्रचनेत दक्षिणेतील पंचायत सदस्य संख्या 18 झाली आहे. तर उत्तरेतील 10 झाली आहे. दक्षिणचा पगडा भारी झाला आहे. आत्ताच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी, भाजपही सत्तेसाठी मैदानात उतरणार हे निश्चित आहे.
पुनर्रचनेत कराड उत्तरेत चरेगाव जिल्हा परिषदेचा नवीन गट अस्तित्वात आला आहे. त्या अंतर्गत चरेगाव व तळबीड हे दोन गण करण्यात आले आहेत. तळबीड गणात तळबीड, वहागांव, खोडशी, बेलवडे हवेली, घोणशी या गावांचा समावेश झाला आहे. तर चरेगाव गणात भवानवाडी, अंधारवाडी, मांगवाडी, शिवडे, हनुमानवाडी, चरेगाव, शितळवाडी, खालकरवाडी, तासवडे, वराडे या गावांचा समावेश झाला आहे. पूर्वी तळबीड गण उंब्रज जि.प. गटात होता. तो चरेगाव गटाला जोडला आहे. तर पाल गटातील चरेगाव गण जि.प. गटात रूपांतरीत झाला आहे.
पाल जि.प.गटात पाल व इंदोली गण आहेत. उंब्रज जिल्हा परिषद गटात उंब्रज व कोर्टी हे दोन गण आहेत. या गटात कोर्टी हा गण नव्याने अस्तित्वात आला आहे. उंब्रज गणात उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बु., कळंत्रेवाडी या गावांचा समावेश आहे. तर नव्याने अस्तित्वात आलेल्या कोर्टी गणात कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भि., कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
मसूर जिल्हा परिषद गटात किवळ गण नव्याने अस्तित्वात आला आहे. या गटात मसूर व किवळ हे दोन गण आहेत. किवळ गणात हेळगाव, पाडळी (हेळगाव), गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निगडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.कोपर्डे हवेली जि.प. गटात पूर्वीचेच वाघेरी व कापर्डे हवेली गण आहेत.
उत्तरमध्ये पंचायत समितीचे 10 गण आहेत. येथे बर्यापैकी राष्ट्रवादीची ताकद आहे. गेली पाच वर्षे याच गटाने पंचायत समितीचे नेतृत्व केले आहे. गेल्या टर्ममध्ये पंचायत समितीत राष्ट्रवादी व उंडाळकर गटाची सदस्य संख्या प्रत्येकी 7 होती. सभापती पद अनु. जातीसाठी राखीव होते. उंडाळकर गटाकडे या प्रवर्गाचा सदस्य नसल्याने संपूर्ण टर्म सभापती पद राष्ट्रवादीला मिळाले. उंडाळकर गटाने उपसभापती पद सांभाळले. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण गटाची सदस्य संख्या 4 व डॉ. अतुल भोसले गटाची सदस्य संख्या 6 होती. मात्र आता राजकीय समिकरणे बदलली असून उंडाळकर व आ. चव्हाण गट एकत्र आला आहे. त्यामुळे निश्चितच दक्षिणेत त्यांची ताकद असणार आहे.
आता दक्षिणेत सदस्य संख्या 18 झाली असल्याने या मतदार संघाचा पंचायत समितीवर पगडा राहील. तरीही पंचायत समितीवर सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी ताकद लावेल. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. या निवडणुकीत गट व गणांनी पुनर्रचना झाल्याने ज्या गावांना कमी लोकसंख्येमुळे उमेदवारी दिली गेली नव्हती. ती गावे यावेळी उमेदवारीसाठी नेत्यांकडे दावा करतील हे निश्चित.
कराड उत्तरेल किवळ व कोर्टी हे दोन नवीन गण अस्तित्वात आला आहे. एक गट मसूर जिल्हा परिषद गटात अस्तित्वात आला आहे. तर दुसरा गण उंब्रज जिल्हा परिषद गटात अस्तित्वात आला आहे. या दोन्ही गावांनी पंचायत समितीत नेतृत्व केले आहे. आता हे दोन्ही गण पंचायत समिती सदस्यत्वाचे दावेदार असतील. दोन्ही गणात सध्या राष्ट्रवादीची ताकद आहे.