351 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला | पुढारी

351 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 351 ग्रामपंंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून प्रभागासाठी दि. 6 रोजी आरक्षण सोडत होणार आहे. ओबीसी वगळून ओपन, एससी, एसटी महिला या प्रवर्गासाठी ही आरक्षण सोडत होणार आहे.

जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये मुदत संपलेल्या सुमारे ग्रामपंचायती व मे 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंंचायती तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीचा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेला कार्यक्रम योग्यरित्या न राबवल्यामुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी कार्यक्रम देण्यात आला होता.

त्यानुसार दि. 27 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सदर आदेशात असेही नमूद केले आहे की, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता जागा राखून ठेवता येणार नाहीत. जिल्हाधिकार्‍यांकडील प्राप्त अहवाल विचारात घेता अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी कायद्यातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशातील निर्णयानुसार आरक्षण कार्यक्रम देण्यात आला आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, व सर्वसाधारण महिला यांच्या करता आरक्षण जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय आरक्षण जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप अधिसुचना व अनुसूची यास व्यापक प्रसिध्दी देण्याची जबाबदारी तहसीलदारांवर राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांतील सुमारे 351 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आल्या आहेत. त्या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील 45, कराड 53, वाई 8, कोरेगाव 51, जावली 19, खंडाळा 2, फलटण 25, पाटण 91, खटाव 15, महाबळेश्वर 12 आणि माण तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचातींसाठी दि. 3 रोजी आरक्षण सोडत काढण्यासाठी ग्रामसभेची सुचना देण्यात येणार आहे.

विशेष ग्रामसभा बोलवून तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली दि. 6 रोजी प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. दि. 7 रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 10 रोजीपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी आहे. दि. 15 रोजीपर्यंत प्रांताधिकार्‍यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणार आहेत. दि. 17 रोजी प्रांताधिकार्‍यांचे अभिप्राय विचारात घेऊन अधिसुचनेस जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. दि. 20 रोजी जिल्हाधिकार्‍यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Back to top button