स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या नावे सुरू केलेली स्कॉलरशिप योजना प्रेरणादायी | पुढारी

स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या नावे सुरू केलेली स्कॉलरशिप योजना प्रेरणादायी

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी असलेली तळमळ याचा विचार करून स्व. बाळासाहेब भिलारे यांनी हिलरेंजची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा वसा जपण्याचे काम कुटुंबीय करत आहेत. दादांच्या नावाने सुरू केलेली स्कॉलरशिप योजना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले.

भिलार येथील हिलरेंज हायस्कूलमध्ये स्व. बाळासाहेब भिलारे स्कॉलरशिप वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सरपंच शिवाजीराव भिलारे, गणपत पार्टे, राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारेे, प्रमोद भिलारे, डॉ. हेमल मकनीजा, प्राचार्य जतीन भिलारे, मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, तेजस्विनी भिलारे आदी उपस्थित होते.

नितीन भिलारे म्हणाले, भिलार जसे पुस्तकांचे गाव आहे. तसेच ते प्रशासकीय सेवेत असलेल्या तरुणांचे गाव व्हायला हवे. त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. तेजस्विनी भिलारे म्हणाल्या, स्व. दादांची स्मृती, कार्य व त्यांचे विचार जपण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली आहे.

यावेळी अनुष्का काळे, आण्वी पार्टे, प्रणव जाधव, प्रकाश बेलोशे, राजेंद्र भिलारे, गणपत पार्टे, पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, इयत्ता पहिली ते नववीत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जतीन भिलारे यांनी आभार मानले. यावेळी शिवराम बिरामणे, आनंदा चोरमले व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Back to top button