सातारा : मोबाईलच्या वापराविना अमित तिसर्‍यांदा यूपीएससीत झळकला! | पुढारी

सातारा : मोबाईलच्या वापराविना अमित तिसर्‍यांदा यूपीएससीत झळकला!

खटाव : पुढारी वृत्तसेवा
बुद्धीवंतांची खाण असलेल्या माण तालुक्यातील भांडवलीच्या अमित लक्ष्मण शिंदे यांनी तब्बल तिसर्‍यांदा यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. सध्या इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अमित यांच्या घवघवीत यशाने माणवासीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. मोबाईल न वापरता त्याने हे यश मिळवले असून नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरणारे आहे.

अमित शिंदे यांचे शिक्षण मलवडी, मुंबई, फलटण, पुणे, राहुरी येथे झाले. दिल्लीत 3 वर्षे त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी केली. 2017 आणि 2018 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये यश मिळविले होते. भारतीय वन सेवा परिक्षेत त्यांनी देशात 73 वा क्रमांक मिळवला होता. सुरुवातीला त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तर सध्या ते कर्नाटकातील हुबळी येथे इन्कमटॅक्स विभागात उच्च पदी कार्यरत आहेत. 2021 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी 572 वी रँक मिळविली आहे.

अमित लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवले होते. चिकाटीने अभ्यास करत त्यांनी तिसर्‍यांदा यूपीएससी परिक्षेत यश मिळवले. गतवर्षीच अमित विवाहबद्ध झाले असून त्यांच्या पत्नीही स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहेत. अमित यांनी यूपीएससी परिक्षेत तिसर्‍यांदा झेंडा फडकविल्याचे समजताच माण तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 सिमकार्ड बाजूला काढून अभ्यास करायचा…

माझी मुले हीच माझी संपत्ती आहे. मला जमीन जुमला नाही. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही त्याच्याकडे मोबाईल नव्हता. स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी तो तीन वर्षे दिल्लीत होता, तेव्हाही त्याच्याकडे मोबाईल नव्हता. अगदी शेवटी त्याने मोबाईल घेतला मात्र त्याचा वापर तो फार क्वचित करायचा. गावाकडे आला तर अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून तो मोबाईलमधील कार्ड बाजूला काढून ठेवत असल्याचे अमितच्या वडिलांनी अभिमानाने सांगितले.

Back to top button