सातारा : ओमायक्रॉनची धास्ती; यंत्रणा पुन्हा अलर्ट | पुढारी

सातारा : ओमायक्रॉनची धास्ती; यंत्रणा पुन्हा अलर्ट

सातारा : पुढारी वृत्तसेवा
ओमायक्रॉनच्या विषाणूचे बीए 4, बीए 5 हे दोन नवे विषाणूचे रुग्ण मुंबई, ठाणे व आता पुण्यात आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाली आहे. नव्या विषाणूचा कम्युनिटी स्प्रेडिंग कमी असल्याने धोका कमी असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून यासाठी दोन आयसीयू व 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

ओमायक्रॉनच्या विषाणूचे बीए 4, बीए 5 हे दोन नवे विषाणू आढळले आहेत. हे विषाणू जास्त धोकादायक नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पुण्यासह महाराष्ट्रात पूर्वीच्या विषाणूंचा संसर्ग, लसीकरणामुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या विषाणूच्या संसर्गापासून दक्ष राहावे लागणार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ‘कप्पा’, ‘डेल्टा’सारखे नवे विषाणू प्रकार आढळले होते. पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून पुण्यात मे महिन्यात आढळलेल्या रुग्णांचे बीजे मेडिकलच्या माध्यमातून ‘आयसर’च्या प्रयोगशाळेने जिनोम सिक्वेन्सिंग केले. त्यातून ओमायक्रॉनचा नवाविषाणू प्रकार शोधण्यात यश आले आहे.

तिसर्‍या लाटेनंतर आता बीए 4 आणि बीए 5 हे विषाणू बाहेरच्या देशात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे फुफ्फुसाला संसर्ग होत आहे. परंतु, भारतीयांमध्ये दोन्ही लाटांमध्ये झालेला संसर्ग, लसीकरणामुळे तयार झालेली सामूहिक रोगप्रतिकारशक्ती यामुळे नव्या विषाणूच्या संसर्गानंतरही सध्या फारसा धोका नाही.

ओमायक्रॉन विषाणूच्या पाश्‍वर्र्भूमीवर अद्याप जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना आल्या नसल्या तरी आरोग्य यंत्रणा मात्र सज्ज झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेप्रमाणे आढळलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत. नव्या विषाणूमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत नाही ही दिलासादायक बाब आहे. शासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली जाईल. मात्र, खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात 52 बेडस्चे दोन आयसीयू तयार आहेत. रुग्णालयातील 100 हून बेड कोव्हिडसाठी रिक्त ठेवले आहेत. जिल्ह्यात कोविडचा एकही रुग्ण नसला तरी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजचे असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

समूहसंसर्ग नसला, तरी दक्ष राहायला हवे

ओमायक्रॉन नव्या प्रकाराचा विषाणू गेल्या महिनाभरापासून पुण्यात असल्याने ‘कम्युनिटी स्प्रेडिंग’ व्हायला हवे होते. मात्र, त्याचा वेग पाहता अद्याप त्याचा समूहसंसर्ग झाला नाही. त्यामुळे फारसे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, या विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते का? तसेच त्यांना अतिदक्षता विभाग किंवा ऑक्सिजनची गरज आहे का? याचे निरीक्षण करावे लागणार आहे. ‘पॅनिक’ होऊ नका, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Back to top button