‘खिळे’कर्‍यांकडून महामार्गालगतचे वृक्ष मुक्त | पुढारी

‘खिळे’कर्‍यांकडून महामार्गालगतचे वृक्ष मुक्त

कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील पाचवड फाटा परिसरात महामार्गालगतच्या वृक्षांनी दै. ‘पुढारी’च्या दणक्यानंतर मुक्त श्वास घेतला आहे. संबंधित स्वार्थी ‘खिळे’कर्‍यांनी कारवाईचा धसका घेत खिळे ठोकून झाडांवर लावलेले फलक हटवले आहेत. पुणे – बंगळूर महामार्गालगत एक ‘शाळा’ भरण्याच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरण्याचे काम काही व्यावसायिकांकडून सुरू होते. मागील काही महिन्यांपासून स्वतःहून हे फलक हटवले जातील आणि संबंधित झाडांना मुक्त श्वास घेता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, संबंधित व्यावसायिकांकडून स्वतःच्या तुंबड्या भरण्याच्या नादात पर्यावरण र्‍हासाकडे आणि झाडांना बसणार्‍या फटक्याकडे साफ कानाडोळा केला जात होता.

त्यामुळेच दैनिक ‘पुढारी’ने शुक्रवार, 20 मे रोजी याबाबतचे सचित्र वृत्त प्रसिद्ध करत सार्वजनिक मालमत्तेच्या होणार्‍या नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सर्वसामान्य नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांकडूनही संबंधित ‘खिळे’करी व्यावसायिकाच्या बेजाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

वास्तविक महाराष्ट्र अधिनियम 1995 अंतर्गत सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. महामार्गालगतची वृक्ष संपदा ही सार्वजनिकच आहे. मात्र, या वृक्ष संपदेकडे रस्ते विकास महामंडळ, स्थानिक प्रशासन नेहमीच कानाडोळा होतो. या व्यावसायिकाची शाळा पाहून ऊस बियाणे विक्री करणार्‍या एका व्यावसायिकानेही याच परिसरात झाडावर खिळे ठोकून आपल्या व्यावसायाची जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या वृक्षांनी मुक्त श्वास घेतला आहे.

महामार्गालगत केले अतिक्रमण

झाडांवरील खिळे काढून काढलेले फलक आता महामार्गावरील कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणार्‍या लेनलगत लावले आहेत. वास्तविक महामार्गालगत असे फलक उभे करता येतात का ? भविष्यात एखादा अपघात झाल्यास कोण जबाबदार? असे प्रश्न उपस्थित होत असून महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

Back to top button