

मारूल हवेली ; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील नाडे (नवारस्ता) येथील शिवांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संचालक व त्यांच्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे कर्ज वितरित करून सुमारे साडेसतरा कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, व्यवस्थापक व संचालक मंडळ अशा 14 जणांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांन्वये मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवांजली पतसंस्थेतील अपहारप्रकरणी लेखापरीक्षक संदीप सुतार यांनी फिर्याद दिली आहे. पतसंस्थेचे संस्थापक व व्यवस्थापक दादासाहेब माथणे (रा.नाडे), चेअरमन जयंत देवकर (रा.नाडे), व्हा.चेअरमन महिपती भिसे (रा.नाडे), व्यवस्थापक अभिजित देवकर (रा. चाफळ), संचालक विनायक माथणे (रा. नाडे), युवराज पाटील (रा. दौलतनगर), संपत पवार (रा. भारसाखळे), चंद्रकांत यादव (रा.पाटण), अशोक घाडगे-पाटील (रा.नाडे), विजय लुगडे (रा. पाटण), तुकाराम माथणे (रा. नाडे), शहानवाज होंबळे (रा. पाटण), देवई दराडे (मयत), पार्वती भिसे (रा.नाडे) अशी
गुन्हा दाखल झालेली नावे आहेत. त्यांनी संगनमत करून शिवांजली पतसंस्थेच्या निधीचा बेकायदेशीरपणे व सहकार खात्याच्या नियमांचे उल्लंघन करून बनावट दस्तऐवज तयार करून अपहार केला आहे.
संस्थेने धोरणास बाधक तसेच ठेवीदारांच्या हितास जाणिवपूर्वक व फसवणुकीच्या उद्देशाने रुपये 13 कोटी 41 लक्ष 27 हजार 924 रपये एवढ्या रकमेचा अपहार व रुपये 4 कोटी 8 लक्ष 17 हजार 650 एवढ्या रकमेचा गैरव्यवहार करून संस्थेची व ठेवीदारांची एकूण 17 कोटी 49 लक्ष 45 हजार 574 एवढ्या रकमेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मल्हारपेठ पोलिसात संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकारामुळे शिवांजली पतसंस्थेच्या ठेवीदार, कर्जदारांसह नवारस्ता परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.