

सातारा /खेड ; पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भानुदास बर्गे यांच्या उसाला तब्बल 20 महिने तोड मिळाली नाही. मुदतीत तोड न झाल्याने हताश झालेल्या बर्गे यांनी मंगळवारी सकाळी तीन एकरांतील ऊस पेटवून दिला. याचवेळी तोडीसाठी आलेल्या कामगारांचा सत्कार करून बर्गे यांनी गांधीगिरी केली.
राजेंद्र बर्गे यांनी तीन एकरांत उसाचे पीक घेतले होते. मात्र, 20 महिने होऊनही त्यांच्या उसाला तोड आली नाही. शेतातील ऊस तोडला जावा यासाठी त्यांनी साखर कारखान्यांकडे मागणी केली. परंतु साखर कारखान्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
मंगळवारी सकाळी त्यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी मजूर व टोळीमालक आले. त्यावेळी ऊसतोड कामगारांनी ऊसात पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिला. यावेळी बर्गे यांनी शेतात 20 महिने उसाचे पीक उभे आहे. गाळपाअभावी
ऊसाच्या वजनात घट होणार असल्याने 3 एकरातील पूर्ण फडच पेटवून दिला. तसेच तोडणीसाठी आलेल्या मजुरांचा बर्गे यांनी सत्कार केला. उसाला दर मिळण्यासाठी 15 कि.मी. हवाई अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बर्गे म्हणाले, राज्यकर्त्यांमुळे आमच्यावर ऊस पेटवून देण्याची वेळ आली. ऊस तोडण्यासाठी टोळी मालकांनी एकरी 8 हजार रुपये मागितले. यासह ट्रॅक्टर टोचन, चालक, जेसीबी यासाठी पैशाची मागणी केली. टोळीमालक व स्लिप बॉय यांनीच ऊस मालकाला विश्वासात न घेता ही रक्कम ठरविल्याचा आरोप बर्गे यांनी केला. ऊस पेटविल्याने सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.