सातारा : डेमू रेल्वे सेवेला 4 कोटींचा फटका | पुढारी

सातारा : डेमू रेल्वे सेवेला 4 कोटींचा फटका

सातारा : पुढारी वृत्तसेवा
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने पुणे-फलटण व लोणंद फलटण मार्गावर डेमू रेल्वे सेवा सुरू केली. या रेल्वेवर दररोज सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला सव्वा चार कोटींचा फटका बसला आहे. पुणे विभागातील सर्वात तोट्यात चालणारी रेल्वे म्हणून डेमूची ओळख झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने नागरिकांसाठी फलटण-पुणे दरम्यान अनारक्षित डब्याची ही नियमित डेमू रेल्वे सेवा दि. 30 मार्चमध्ये सुरू झाली. कृषी उत्पादन आणि कंपन्यामुळे फलटण ते पुणे आणि इतर शहरांमध्ये प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. या विशेष डेमू रेल्वेमुळे प्रवाशांची वेळ आणि पैशाची बचत होणार या अनुषंगाने ही रेल्वे सेवा सुरू झाली.
पुणे-फलटण व लोणंद- फलटण डेमू रेल्वे नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. परंतु, याकडे प्रवाशांनी पूर्णत: पाठ फिरवली आहे. पूर्ण रेल्वेमध्ये दररोज 4 ते 5 प्रवासी व 4 रेल्वे कर्मचार्‍यांसाठी ही रेल्वे धावत आहेे. त्यामुळे रेल्वेच्या एका फेरीतून दिवसाला मध्य रेल्वेला सुमारे 200 रुपयांचे उत्पन्न मिळते. ही रेल्वे डिझेल आणि इलेक्ट्रिकवर धावते. त्यामुळे याचा खर्च जास्त आहे.

डेमूच्या एका फेरीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाला सुमारेे 8 लाख रुपयाहून अधिक खर्च येत असतो. 53 दिवसांपासून ही सेवा सुरू असून या कालावधीत रेल्वेला 4 कोटी 24 लाख रूपयांचा फटका बसला आहे. इतका तोटा सहन करूनही ही रेल्वे सेवा सुरू ठेवावी लागत आहे. या दोन मार्गावर ज्या फेर्‍या होतात त्यामध्ये रोज चार तिकिटांवर अवघे 6 प्रवासी प्रवास करत असल्याचे विदारक चित्र आहे.

पुणे-फलटण व लोणंद- फलटण या मार्गावर डेमूचा रेक अडकून पडला आहे. त्यामुळे तो अन्य मार्गावर वापरलाही जात नाही. त्यामुळेही रेल्वेचे नुकसान होत आहे. पुणे विभागात मेमू व डेमू रेकची कमतरता आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आयसीएफकडे 4 मेमू रेकची मागणी केली असली तरी ते उपलब्ध होण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी जाणार आहे हीच परिस्थिती डेमू रेकच्यासंदर्भात आहे.कमी प्रतिसाद लाभलेल्या रेक पुणे- मिरज व पुणे-दौंड मार्गावर वापरल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे तसेच प्रवासी संख्या वाढल्यास रेल्वेचे उत्पन्‍न वाढणार आहे.

अवघे 41 हजार 790 रुपयांचे उत्पन्‍न

डेमू रेल्वे सेवेतून दिवसात फक्‍त 200 रुपये मिळत असल्याची परिस्थिती आहे. पुणे-फलटण डेमूच्या 53 दिवसांत 429 तिकिटे काढण्यात आली आहेत. त्यामध्ये 606 प्रवाशांनी प्रवास केला असून 27 हजार 325 रुपयांचे उत्पन्‍न मिळाले आहे. फलटण- लोणंद डेमूच्या 53 दिवसांत 59 जणांनी प्रवास केला. त्यातून 1 हजार 770 रुपये उत्पन्‍न मिळाले. लोणंद-फलटण डेमूच्या 53 दिवसात 20 तिकिटे काढून 29 प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये अवघे 990 रुपयांचे उत्पन्‍न मिळाले आहे. फलटण-पुणे डेमूच्या 53 दिवसात 259 तिकिटे काढून 419 जणांनी प्रवास केला. त्यामधून 19 हजार 705 रुपयांचे उत्पन्‍न मिळाले. चारही रेल्वे फेर्‍यासाठी 767 तिकिटातून 1 हजार 113 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून 41 हजार 790 रुपयांचे उत्पन्‍न मिळाले आहे.

पुणे -फलटण व लोणंद-फलटण मार्गावर धावणार्‍या डेमू रेल्वेची प्रवासी संख्या व उत्पन्नावर मध्य रेल्वेचे विविध विभाग लक्ष ठेवून असून याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे.
वरिष्ठ अधिकारी (मध्य रेल्वे, पुणे)

Back to top button