

मेढा (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
'अमर रहे, अमर रहे, प्रथमेश पवार अमर रहे' अशा घोषणा देत, सातारा पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फ कुडाळ व जावलीवासीयांनी डेरेवाडीत साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत प्रथमेश यांना वीरमरण प्राप्त झाले. यामुळे अवघा जावली तालुका शोकाकुल होता. बामणोली तर्फ कुडाळ गावात दोन दिवस चूलही पेटली नाही. शहीद प्रथमेश पवार यांचे पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीयांसह अवघे गाव शोकाकुल झाले. कुडाळ येथून सकाळी 8 वा. शहीद प्रथमेश पवार यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला.
प्रथमेश यांच्या घरी डेरेवाडी येथे घरासमोर पार्थिव आणल्यानंतर आई राजश्री पवार, वडील संजय पवार, लहान भाऊ आदित्य यांच्या अश्रूंचा बांध फुटला अन उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखे झाले. संपूर्ण परिसर साश्रू नयनांनी गलबलून गेला. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, दिपक पवार, वसंतराव मानकुमरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.जान्हवी खराडे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सपोनि अमोल माने यांनी शहीद जवान प्रथमेश पवार यांना मनोगतातून आदरांजली वाहिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.
सातारा पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून प्रथमेशला मानवंदना दिली. शहीद प्रथमेश पवार यांचा भाऊ आदित्यने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी शहीद प्रथमेश पवार अमर रहे, वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. अंत्यसंस्कारानंतर उपस्थितांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली.
रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खा गाव रस्त्यावर आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी गर्दी केली होती. 'अमर रहे अमर रहे, प्रथमेश पवार अमर रहे'च्या घोषणा देत अंत्ययात्रा पवार यांच्या गावात आल्यावर संपूर्ण गाव गहिवरून गेला.