देवगड हापूस सांगून कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

तळमावले : नितीन कचरे
देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही व्यापारी देवगड हापूस सांगून कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही व्यापारी ओरिजनल देवगड हापूसची विक्री करीत आहेत. तर मार्केटमध्ये अनेक व्यापारी देवगडच्या नावाखाली कर्नाटकी हापूसची विक्री करीत आहेत.

देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याचा सद्यस्थितीत दर सरासरी पाचशे, सहाशे ते सातशे रुपये प्रति डझन आहे. कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री प्रति डझन तीनशे रुपयांच्या आतमध्ये विक्री केली जात आहे. एवढी मोठी तफावत यामध्ये आहे. संबंधित व्यापार्‍यांकडे देवगड (रत्नागिरी) हापूस आंबा लिहलेले स्टिकर त्या बॉक्सवर लावण्यात येत आहेत. काही व्यापारी ओरिजनल देवगड हापूस आंब्याची विक्री करीत आहेत. या आंब्याचे दर कर्नाटक हापूस पेक्षा जास्त आहेत. ज्या नागरिकांना ओरिजनल हापूस आंबा खायचा आहे त्यांनी काळजीपूर्वक आंबा खरेदी करणे आवश्यक आह. देवगड हापूस आंब्याची झाडे ही जांभ्या खडकात लाल मातीमध्ये असतात.
खारे वारे लागल्यामुळे व पोषक वातावरण लाभल्याने त्या आंब्याला विशिष्ट चव प्राप्त होते. काही जानकार नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड हापूस आंबा चिरल्यानंतर तो आतमध्ये केसरी रंगाचा आहे तर कर्नाटकी हापूस आंबा पिवळसर रंगाचा आहे. देवगड हापूस आंब्याची साल पातळ असते.

कर्नाटकी हापूस आंब्याची साल जाड असते. तसेच देवगड हापूस आंबा पिवळसर व त्यावर हिरव्या रंगाच्या छटा असतात. कर्नाटकी हापूस आंबा पूर्णपणे गडद पिवळ्या रंगाचा असतो.देवगड हापूस आंब्याच्या देठाजवळ थोडा खड्डा पडलेला असतो. देवगड हापूस आंबा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आपण ओळखू शकतो. अशा प्रकारे देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याचा गोडवा आणि चव कर्नाटकी हापूस पेक्षा सरस आहे. तरी कर्नाटकी देवगड आंब्याची विक्री करणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री ही कर्नाटकच्या नावानेच झाली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. तो आंबा देवगड आहे असे दाखवून विकला जात आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे.

मार्केटमध्ये अनेक आंबा विक्रेते देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली स्वस्तात कर्नाटकी हापूस आंबा विकत आहेत. त्यामुळे देवगड समजून ग्राहक कर्नाटकी हापूस घेत आहेत. ही फसवणूक थांबायला हवी.
– सुनील दळवी
आंबा विक्रेते, सातारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news