महानगरपालिका मुख्यालय जागेचा प्रश्‍न सुटला | पुढारी

महानगरपालिका मुख्यालय जागेचा प्रश्‍न सुटला

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीच्या जागेचा प्रश्‍न सुटला आहे. जागा बदलण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय कृषी विभागाकडून शासनाला सादर झाला आहे. जागा बदलास मान्यतेची कार्यवाही महिन्यात पूर्ण होईल, असे संकेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले.

विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उत्तरेकडील बाजूस महानगरपालिकेची नवीन मुख्यालय इमारत होणार आहे. याठिकाणी महानगरपालिकेची जागा आयताकृती आहे. कृषी विभाग व महापालिकेच्या काही जागेची अदलाबदल केल्यास महानगरपालिकेचे मुख्यालय चौरस जागेत अधिक चांगल्याप्रकारे होणार आहे. त्यामुळे या ठिकाणची जागा बदलण्यास महापालिकेने कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

कृषी विभागाच्या या जागेसंदर्भात विचारले असता आयुक्त कापडणीस म्हणाले, महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसाठी आवश्यक काही जागा बदलण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय कृषी विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी सादर झाला आहे. महानगरपालिकेचे शंभर मीटर बाय शंभर मीटर जागेत चौरसाकृती मुख्यालय इमारतीसाठीचा जागेचा प्रश्‍न सुकर बनला आहे. मुख्य रस्त्यावरून प्रवेश; खासगी तीन मालमत्तांचे होणार अधिग्रहण मिरज-सांगली या मुख्य रस्त्यावरून महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीकडे जाण्याचा प्रवेशमार्ग असणाार आहे. या मार्गात तीन खासगी मालमत्ता आहेत. त्यांना मोबदला देऊन संबंधित जागेचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहितीही आयुक्त कापडणीस यांनी दिली.

कापडणीस म्हणाले, हनुमाननगर येथील महानगरपालिकेच्या जागेत एसएमकेसी क्‍लब उभारण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी हा क्‍लब उभारण्यात येणार आहे. एसी हॉल, लॉन, रेस्टॉरंट, रूम, व्हीआयपी सूट, योगा हॉल, जिम, टेनिस कोर्ट व अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. कर्मचार्‍यांच्या मुलांची लग्ने व अन्य कार्यक्रमांसाठी तसेच कर्मचार्‍यांना व्यायामासाठी उपयोग होणार आहे. तीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात 1 कोटींची तरतूद केलेली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून ‘डीपीसी’तूनही तरतूद होणार आहे. नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले

महानगरपालिकेच्या शाळा ‘मॉडेल स्कूल’ केल्या जाणार आहेत. पहिल्या मॉडेल स्कूलसाठी मिरज येथील महापालिका शाळा नं. 19 ची निवड केली आहे. महानगरपालिका आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमानेे ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित केली जाणार आहे. भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी 35 लाख रुपये देणार आहेत. आभाळमाया व लोकसहभागातून उर्वरित रक्कम उभारली जाणार आहे. महानगरपालिकेची बालवाडी ‘स्क्रिन फ्री’ असेल. बालकांना विविध 39 प्रकारच्या खेळण्यांद्वारे आनंददायी शिक्षण दिले जाणार आहे. बालवाडी शिक्षिकांना वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Back to top button