राज्यातील 1147 गावांमध्ये मधमाशा पालन

राज्यातील 1147 गावांमध्ये मधमाशा पालन
Published on
Updated on

सातारा ; प्रवीण शिंगटे : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि मेळघाटातील सातपुडा पर्वत, राज्यातील उर्वरीत भागात वाढलेल्या फळबागा मधमाशा पालनास पुरक आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मधमाशा पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा या दृष्टीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 1 हजार 147 गावामधील 5 हजार 103 हून अधिक शेतकरी मधमाशा पालनाकडे वळले आहेत. मधमाशापालनातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे.

पश्चिम घाट क्षेत्र जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ठ झाल्याने या ठिकाणी असणारी वनसंपदा निसर्गाचे व पर्यावरणाचे संवर्धन जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा सर्व उद्दीष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

मधमाशी केवळ मध आणि मेण देत नाही तर तिने केलेल्या परागीकरणामुळे पीक उत्पादन वाढते शिवाय उत्पादनाची प्रतही सुधारते. शेतीबरोबरच डोंगरदर्‍यातील नागरिकांनी उत्पन्नाचे अन्य पर्याय म्हणून मधमाशा पालनासारख्या व्यवसायाची निवड केली आहे. पश्चिम घाटातील डोंगर दर्‍या व अतिदुर्गम भागात राहणार्‍या लोकांना मधमाशापालन हा उद्योग आर्थिक स्थैर्य देत आहे.

सातेरी मधमाशापालनात अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रागांमधील तालुक्यांचा समावेश आहे. वर्षभर सदाहरीत असणार्‍या जंगलभागात मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाशापालन करण्यास वाव आहे.सध्या हजारो मधपाळ शास्त्रोक्त पध्दतीने मधमाशापालन करत आहेत. जंगलातील विविध वनस्पतीपासून मिळणारा मध औषधीमुल्य असणारा आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मेलीफेरा मधमाशापालनास मोठा वाव आहे. मध हा शरीराला अत्यंत उपयुक्त घटक आहे. मध शक्तीदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाशापासून मेण मिळते. मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे, चर्च मधील मेणबत्या तयार करण्यासाठी होतो. परागीभवनामुळे शेतीपीक उत्पादनात वाढ होत आहे. पराग व मधमाशांचे विष संकलन होत असून रॉयलजेलीचेही संकलन होत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील 18 गावातील 158 मधपाळ शेतकरी व कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यातील 33 गावातील 83 मधपाळ शेतकरी सेंद्रीय पध्दतीने मध संकलन करत आहेत.

राज्यात 16 हजार 400 मधमाशांच्या वसाहती

राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 1 हजार 147 गावांमध्ये 5 हजार 103 मधपाळ असून त्यांच्याकडे सातेरी मधमाशांच्या 18 हजार 378 तर मेलीफेरा मधमाशांच्या 12 हजार 450 अशा मिळून 30 हजार 828 मधपेट्या आहेत. सातेरी मधमाशांच्या चालू वसाहतीची संख्या 9 हजार 273 तर मेलीफेरा वसाहतीची संख्या 7 हजार 122 असे मिळून 16 हजार 395 मधमाशांच्या वसाहती आहेत.

मध उद्योगास पोषक जिल्हे…

राज्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, परभणी, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे मध उद्योगास पोषक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news