सातारा : फलटण येथे बाणगंगा नदीच्या पुलावरुन ट्रेलर कोसळून एक ठार | पुढारी

सातारा : फलटण येथे बाणगंगा नदीच्या पुलावरुन ट्रेलर कोसळून एक ठार

साखरवाडी : पुढारी वृत्तसेवा
फलटण-लोणंद रोडवर बाणगंगा नदीवरील पुलावरुन 22 चाकी ट्रेलर 50 फूट खाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात एकजण ठार झाला तर एकजण जखमी झाला आहे.

करप्पा रेवन गावडे (रा. तरंगेवाडी जवळा ता. सांगोला जि. सोलापूर), असे अपघातात ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर ट्रेलर चालक चालक विजय शामराव बुरंगे ( रा. बुरुंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ट्रेलर चालक विजय बुरंगे व त्याच्याबरोबर असलेला बदली ड्रायव्हर करप्पा गावडे हे दोघे पुण्यावहून सांगोला येथे 22 चाकी ट्रेलर (क्र. एम एच 09 एफ एल 1109) घेवून निघाले होते.

हा ट्रेलर लोणंद-फलटण रोडवरती बाणगंगा नदीच्या पुलाच्या जवळ आल्यावर समोरुन आलेल्या वाहनाचा प्रकाश अचानक चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रेलर पुलावरुन सुमारे 50 फूट खाली कोसळला. या अपघातामध्ये करप्पा गावडे हे जागीच ठार झाले तर चालक विजय बुरंगे हे जखमी झाले आहेत. या अपघाताची फलटण शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Back to top button