सातारा : मांघर होणार देशातील पहिले मधाचे गाव | पुढारी

सातारा : मांघर होणार देशातील पहिले मधाचे गाव

सातारा : प्रविण शिंगटे
मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा, यासाठी मध संचालनालयामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मधमाशांच्या संवर्धनासाठी महाबळेश्‍वर तालुक्यातील संपूर्ण गाव उभे राहत आहे. ‘मांघर’ हे देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून या गावची निवड करण्यात आली असून गावाची ओळख देशभर होणार आहे. कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधूपर्यटन ही संकल्पना रुजण्यास मदत होणार आहे.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील 60 वर्षांपासून मधमाशा पालनासंदर्भात कार्यरत आहे. मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा या उद्देशाने 1957 साली मध संचालनालयाची स्थापना देखील महाबळेश्‍वर येथे करण्यात आली आहे. मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा यांनी ‘मधाचे गाव’ ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला साकरण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने कामकाज सुरु केले आहे.
‘मांघर’ या महाबळेश्‍वर तालुक्यातील गावाची निवड ‘देशातील पहिले मधाचे गाव’ म्हणून करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंत्रालय स्तरावर झाली आहे.

मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या 80 टक्के शेतकरी मधमाशापालन करत आहेत. या गावाच्या आजूबाजुला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फुलोरा आहे. या गावाने आज अखेर शासनाचे जवळपास 10 पुरस्कार मिळवले आहेत. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या गावात निवडणूक झाली नाही, हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. सुंदर स्वच्छ असणार्‍या या गावात मधमाशांमुळे समृद्धी आली आहे. या सगळ्याचा विचार करुन मांघर गावची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्‍वरला येणारे लाखो पर्यटक या गावाला भेट देऊन येथील मधपाळांनी संकलीत केलेला शुद्ध मध चाखणार आहेत. या गावात सामूहीक मधमाशांचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्याकडे कमीत कमी दहा मधमाशांच्या पेट्या आहेत. मधमाशांपासून मध, मेण व इतर उत्पादने तयार करण्यासाठी या गावात मधमाशांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संकलीत केलेला मध गावच्या ब्रँन्डने विकला जाणार आहे. गावात मधमाशांची माहीती देणारे फलक लावण्यात येणार असून संपूर्ण गाव मधमाशांच्या विविधतेने सुशोभित केले जात आहे.

प्रकल्पाचा उद्या शुभारंभ

मांघर, ता. महाबळेश्‍वर येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार्‍या मधाचे गाव या प्रकल्पाचा शुभारंभ सोमवार दि. 16 मे रोजी सकाळी 11 वा. उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी उद्योग व जनसंपर्क राज्यमंत्री ना. आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. मकरंद पाटील, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या श्रीमती अन्शु स्निहा, उद्योग विभागाचे अप्पर सचिव बलदेव सिंह, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मांघरच्या सरपंच यशोदा जाधव, महाबळेश्‍वर मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी केले आहे.

मधमाशांच्या परपरागिकरणामुळे शेतीपिक उत्पादनात भरघोस वाढ होत असते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी मधमाशी पालनाकडे वळण्यासाठी ‘मधाचे गाव’ ही संकल्पना मैलाचा दगड ठरणार आहे.

– बिपीन जगताप,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई.

Back to top button