सातारा : पॉझिटिव्हीटी रेटचा चढ-उतार सुरुच | पुढारी

सातारा : पॉझिटिव्हीटी रेटचा चढ-उतार सुरुच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी जास्त होत आहे. बाधित, मृत्यू आणि पॉझिटिव्हीटी रेटचा चढ -उतार सुरूच आहे. बुधवारी 5 टक्क्यांवर आलेला पॉझिटिव्हीटी रेट दुप्पट होऊन 10 टक्क्यांच्या घरात गेला आहे.

गुरुवारी 993 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यापासून ओसारताना दिसत आहे. कोरोना आलेख कमी-जास्त होत आहेत. बुधवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्के इतका होता. तर गुरुवारी तो 10 टक्क्यांवर गेला आहे. बुधवारी दिवसभरात 10 हजार 707 जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील 993 बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 9.27 टक्के इतका झाला आहे.

तर सातारा, कराड व फलटण या तालुक्यात पुन्हा बाधित आकडा वाढू लागला असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जावली 23, कराड 179, खंडाळा 53, खटाव 111, कोरेगाव 96, माण 99, महाबळेश्वर 1, पाटण 19, फलटण 153, सातारा 179, वाई 74 व इतर 6 असे बाधित आढळले आहेत.

तर जिल्ह्यातील बाधित आकडा 2 लाख 22 हजार 558 इतका झाला आहे. तर कराड 5, खंडाळा 1, खटाव 2, कोरेगाव 1, माण 3, पाटण 1, सातारा 2 व इतर 1, अशा आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5393 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात निर्बंध ‘जैसे थे’

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांतील आरटी-पीसीआर दर अनुक्रमे 8.31 आणि 7.03 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊन निर्बंध ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. दुसर्‍या टप्प्यात उसळलेली कोरोना लाट कमी झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांतील निर्बंध कमी केले आहेत. मात्र त्या 11 जिल्ह्यांचा समावेश तिसर्‍या टप्प्यात कायम ठेवण्यात आला असून त्यामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. सध्या तिसर्‍या टप्प्यातील नियमांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास कोरोना संसर्ग दर कमी आला आहे. 22 जुलै ते 28 जुलै चा आरटी-पीसीआर दर 8.31 टक्के आला आहे.

तर 29 जुलै ते 4 ऑगस्ट या सहा दिवसांचा आरटी-पीसीआर दर 7.03 इतका आला आहे. दोन्हीही आठवड्यांचा आरटी-पीसीआर चाचण्यांचा दर 10 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या असलेलेच निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. भविष्याच्या दृष्टीने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून काही प्रमाणात निर्बंध घालू शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी दुपारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Back to top button