शरद पवार म्हणाले, आधार नसणार्‍यांकडूनच जातीयवादी विधाने | पुढारी

शरद पवार म्हणाले, आधार नसणार्‍यांकडूनच जातीयवादी विधाने

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : आज देशात महागाई आणि बेकारी वाढली आहे, या विषयाकडे न पाहता भोंग्याचे व जातीयवादाचे विषय घेतले जात आहेत. जातीयवादाबाबत ज्यांनी विधाने केली ती विनोदी असून त्याचा मी आस्वाद घेतला आहे. अशा प्रकारची विधाने करणार्‍यांना लोक हसतात. ज्यांना आधार नाही ते अशी लोकांची मने भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत. ती काही फार दिवस टिकणार नाहीत, असा टोला खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना लगावला. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचं विद्यापीठ व्हावं हे कर्मवीर अण्णांचे स्वप्न होतं. राज्यपालांच्या मंजुरीनंतर जूनमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण कार्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. रयत ही देशातील प्रमुख शिक्षण संस्था असून विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कर्मवीरांनी लावलेल्या रोपट्याला आलेली फळे संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 63 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, मंत्री ना. डॉ. विश्वजित कदम, खा. श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. शशिकांत शिंदे, आ. आशुतोष काळे, आ. प्रशांत ठाकूर, पद्मश्री राहीबाई पोपेरे, रतनबाई गणपतराव देशमुख, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, सुभाषराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षण कार्यासाठी आयुष्य झोकून दिले. सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना यश प्राप्तीसाठी ज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. ही संधी देणे ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून त्यांनी संपूर्ण आयुष्य ज्ञानदानासाठी खर्ची घातले. रयत ही देशातील प्रमुख संस्था झाली आहे. संस्थेच्या 449 शाखा, 4 लाख 46 हजार विद्यार्थी आणि 15 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले. खतपाण्याची जबाबदारी सर्वांनी घेतल्याने या रोपट्याची वाढ झाली असून त्याची फळे महाराष्ट्रात पहायला मिळत आहेत.

रयत संस्थेत नवनवीन कार्यक्रम हाती घेत असताना दानशूर पुढे येतात. त्यांचे अर्थसहाय्य होत असल्याने नवीन उपक्रम सुरु करतो. रयतेनं स्वत:चं विद्यापीठ काढावं, अशी कर्मवीर अण्णांची इच्छा होती. हे विद्यापीठ काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. काही गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरु करणार आहोत, अशी घोषणा करुन खा. पवार पुढे म्हणाले, शिक्षणात संकटे आली, शाळा, कॉलेजेस बंद झाली, शिक्षणाचे काय करायचे हा प्रश्न होता. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेने केला. खेड्यापाड्यातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत होते. आधुनिक तंत्रज्ञान लोकापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. संस्था विविध उपक्रम हाती घेत असते. संस्थेतील शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी फ्रेंच कंपनीचे लोक येणार आहेत. त्या माध्यमातून शिकणार्‍या सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना सेवेमध्ये घेण्याचा करार त्यांनी केला आहे.

खा. पवार पुढे म्हणाले, वृत्तपत्रात बातमी आहे की, यावर्षी देशातून परदेशात 40 हजार कोटींची साखर निर्यात झाली असून या निर्यातीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. हे कसं झालं? कारखानदारी उभी राहिली, शेतकर्‍यांनी कष्ट केले. उत्तमप्रकारे ऊसशेती झाली. ही कारखानदारी चालवण्यासाठी शिक्षित वर्ग गावोगावी उभा करण्याचे काम कर्मवीर आण्णांनी केले. त्यामुळे ऊस कारखानदारी होवू शकली. या कारखानदारीतून हजारो कोटींचा माल निर्यात करु शकलो. शैक्षणिक दालन हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे.

सेंद्रिय व देशी बियाण्यांची शेती करण्याचा आदर्श राहीबाईंच्या निर्माण आहे. कर्मवीर अण्णा असते तर राहीबाईंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला एन्. डी. पाटील नाहीत, असे कधी झाले नाही. एन्. डी. पाटील, गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे यांनी संस्था कार्यात आयुष्य झोकून दिले. संस्थेचे कोणतेही काम किंवा समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली. गणपतराव देशमुख यांनी सामान्यांचे दु:ख मांडण्याचे काम केले. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांनी अण्णांचा विचार गावोगाव पोहोचवला, असेही खा. पवार म्हणाले.

ना. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. संस्थेचे धोरणात्मक निर्णय विद्यार्थी विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कार्य विस्तारत असून या संस्थेला भवितव्य आहे.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, भावी पिढ्यांसाठी देशी बियाणे व सेंद्रिय शेती फायदेशीर आहे. परिस्थितीने शाळा शिकले नाही मात्र शेतीतून ज्ञान मिळाले. देशी बियाणांची रोपे बचत गटांना दिली. हळदी कुंकु कार्यक्रमात देशी रोपे वाण म्हणून महिलांना दिली. आजार वाढण्यामागे असलेली कारणे शोधली जात नाहीत. काळ्या आईचा विचार करा. रासायनिक खते वापरुन तिचे आयुष्य संपवले जात आहे. विषमुक्त शेती केली तरच आपण आपले आरोग्य चांगले राखू शकतो.

दरम्यान, मान्यवरांनी कर्मवीर समाधीस्थळास अभिवादन केले. प्रा. संभाजी पाटील यांनी रयतगीत सादर केले. शाळा, महाविद्यालये, प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रात कामगिरी करणार्‍या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले. देणगीदारांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. संस्थेच्या कार्याचा डॉ. अनिल पाटील यांनी आढावा घेतला.

Back to top button