शरद पवार : आबा, तुम्ही शेतकर्‍यांचे संसार वाचवले | पुढारी

शरद पवार : आबा, तुम्ही शेतकर्‍यांचे संसार वाचवले

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यासाठी सातार्‍यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आल्या-आल्याच ‘काय मकरंदआबा निवडणूक जोरात केली’, असे म्हणत ‘मला आनंद आहे, तुम्ही शेतकर्‍यांचे संसार वाचवले’, अशा शब्दात आ. मकरंद पाटील यांना त्यांनी शाबासकी दिली.

दुपारी शासकीय विश्रामगृहावर आलेल्या खा. शरद पवार यांचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले. आल्या आल्याच खा. शरद पवार यांनी आ. मकरंद पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले, निवडणूक जोरात केली. आबा, तुम्ही शेतकर्‍यांचे संसार वाचवले आहेत. पण आजपासून तुम्हाला त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पावले उचलावी लागतील. त्यावर हसून आ. मकरंद पाटील म्हणाले, काही झालं तरी तुम्ही आहेच की. तुम्ही, अजितदादा, ना. रामराजे, ना. बाळासाहेब पाटील यांच्या जीवावर तर ही उडी घेतली. सगळ्यांनी सहकार्य केले आहे.

लोकांचा उठाव होता त्यामुळे निर्णय घ्यावा लागला. साहेब, तुम्ही म्हणाला होता या फंदात तू पडू नकोस, मात्र माझ्यावर जतनेचे प्रेशर होते. आता तुम्हाला मदत करावी लागेल, अशी गळ आ. मकरंद पाटील यांनी घातली. त्यावर खा. शरद पवार यांनी सहकार मंत्र्यांकडे पाहून बाळासाहेब, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आज रात्रीच बसू. अजितदादा किती वाजता येणार आहेत? त्यांना सांगा आपल्याला महत्वपूर्ण बैठक आहे. मकरंदआबा तुम्ही व तुमची मोजकी माणसे बोलवा असे खा. शरद पवार यांनी सांगितले. त्याचवेळी 9 हजार 500 म्हणजे खूप लिड मिळाले. निवडणूक एकतर्फीच झाली म्हणायची असे म्हणत खा. शरद पवार यांनी मकरंदआबांचे कौतुक केले.

याच बैठकीत तालीम संघाचे पदाधिकारी खा. शरद पवार यांना भेटले. महाराष्ट्र केसरीचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल साहेबराव पवार, दीपक पवार, सुधीर पवार यांनी खा.शरद पवार यांचे आभार मानले.

Back to top button