किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान | पुढारी

किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान

वाई ; पुढारी वृत्तसेवा : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रचारात उडालेली राळ व एकमेकांवर केलेले टीकेचे घाव अशा वातावरणात किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. आ. मकरंद पाटील व कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्या पारंपरिक राजकीय संघर्षाची, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील व कोरेगावचे आ. महेश शिंदे यांच्याही नेतृत्वाची ही लढाई आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे किसनवीरच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र, 52 हजार सभासद असणारा किसन वीर हा जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत कारखान्यावरील वाढत्या कर्जाचा बोजा आणि झालेली आर्थिक कोंडी यामुळे कारखाना बंदच राहिला. कारखान्याचा हंगाम सुरू न झाल्याने प्रथम नितीनकाका पाटील यांनी किसनवीर कारखान्यावरील कर्जाचा लेखा-जोखा मांडला.

यावर प्रतिउत्तर म्हणून चेअरमन मदनदादा भोसले यांनी नुसते आरोप काय करता मैदानात या, असे प्रति आव्हान दिले. याच कालावधीत कारखाना सुरू न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यामुळे तब्बल दशकभर किसनवीरच्या निवडणुकीपासून लांब राहिलेल्या आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी किसनवीर कारखान्याची यंदाची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला.

कृष्णकाठी पुन्हा पाटील विरूध्द भोसले हे द्वंद्व रंगणार हे निश्चित झाले. गत दोन निवडणुकांमध्ये पुरेसे अर्ज दाखल न झाल्याने संचालक बिनविरोध होत होते. मात्र, यंदा तब्बल 340 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पाटील व भोसले गटातील समर्थकांचीच संख्या जास्त होती. अर्ज माघारीनंतर 21 जागांसाठी 46 जणांमध्ये लढत होत आहे. यामध्ये एकूण 52 हजार 90 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

प्रचारात आ. मकरंद पाटील यांनी मदनदादा भोसले यांच्यावर चुकीचा केलेला कारभार, कारखान्यातील भ्रष्टाचार, कारखान्यावर वाढलेला कर्जाचा बोजा, शेतकरी व कामगारांची थकलेली देणी, लाखो टन शिल्लक राहिलेला ऊस यासह विविध मुद्यांवरून रान पेटविले. त्यांना बंधू नितीनकाका पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची साथ मिळाली.

तर मदनदादा भोसले यांनीही पाटील बंधूंमुळेच किसनवीर कारखाना कसा अडचणीत आला, खंडाळा कारखाना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांना अद्याप सुरू करता आला नाही, त्यांच्याकडे सहकारी संस्था चालविण्याचा नसलेला अनुभव, किसनवीरचे खासगीकरण करण्याचा त्यांचा असलेला डाव यासह विविध मुद्यांवरून जोरात प्रचार यंत्रणा राबविली. मदनदादांना आ. महेश शिंदे तसेच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी साथ दिली. मतदानाच्या पूर्वसंध्येला दोन्ही नेत्यांकडून मतदारांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू होता.

मंगळवारी कारखान्यासाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. मतदारराजा कुणाच्या पारड्यात आपले दान टाकतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यामुळे यंदा कारखान्यावर मकरंदआबा की पुन्हा मदनदादाच हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Back to top button