सातारा : मंदार वग्याणीला पोलिस कोठडी | पुढारी

सातारा : मंदार वग्याणीला पोलिस कोठडी

सातारा : पुढारी वृत्तसेवा

13 लाख रुपयांचे बिल पुढील कार्यालयात मंजुरीला पाठवण्यासाठी 39 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मंदार वग्याणी याला सातारा लाचलुचपतच्या (एसीबी) पथकाने अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, एसीबीने घरझडती घेतली असून प्रॉपर्टीची माहिती घेतली जात आहे.
मंदार प्रकाश वग्याणी (वय 41, सध्या रा. फलटण, मूळ रा. वर्धमान, सोनाक्लिनिक जवळ, आप्पासाहेब पाटीलनगर, आंबराईच्या
मागे, सांगली) असे संशयिताचे पूर्ण नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने एसीबीमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी फलटण वीज वितरण कंपनीमध्ये 13 लाखांचे काम केले होते. या कामाचे बील मंजुरीला पुढच्या कार्यालयात पाठवण्यासाठी कार्यकारी अभियंता मंदार वग्याणी याला ते भेटले असता त्याने 3 टक्क्यांप्रमाणे 39 हजार रुपयांची लाच मागितली.

लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबी विभागात जावून तक्रार देताच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना संशयिताला रंगेहात पकडले. फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित वग्याणी याला अटक करुन बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाने याप्रकरणी आणखी तपास करायचा असल्याचे सांगून पोलिस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

छाप्यानंतर संपत्तीची चौकशी सुरू…

मंदार वग्याणी याला अटक केल्यानंतर तो राहत असलेल्या फलटण येथे सातारा एसीबीने छापा टाकला. दुसरीकडे तो मूळचा सांगलीतील असल्याने त्याठिकाणी सांगली एसीबीनेही छापा टाकला. फलटण येथील शासकीय निवासस्थानामध्ये घरगुती वस्तू वगळता काही आढळले नाही. सांगली येथील एसीबी तपास करत असल्याची माहिती सातारा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.

Back to top button