हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अन् भव्य रिंगण सोहळा | पुढारी

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अन् भव्य रिंगण सोहळा

सणबूर ः पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे तीन दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. भव्य दिव्य दिंडी सोहळ्याने ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पूर्णाकृती पुतळ्यावर व स्व. शिवाजीराव देसाई यांचे समाधीस्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे 13 वे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले आहेत. वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने, किर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. या संपूर्ण पारायण सोहळयामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ. स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पूर्ण झालेनंतर फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली. दिंडी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच 21 तोफांची सलामी देण्यात आली.

 

Back to top button