शिवेंद्रराजेंविरोधात राष्ट्रवादीचा अ‍ॅटॅकच पाहिजे : जयंत पाटील | पुढारी

शिवेंद्रराजेंविरोधात राष्ट्रवादीचा अ‍ॅटॅकच पाहिजे : जयंत पाटील

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार राष्ट्रवादी पक्षात येणार, अशी चर्चा आपण करत आहोत. पक्ष बघेल त्यांना घ्यायचे का नाही? तो पुढचा प्रश्न आहे; पण ते भाजपमध्ये गेले हेे मनात घटवून ठेवा. भाजप आपला प्रमुख विरोधी पक्ष आहे. शिवेंद्रराजे आपल्या पक्षात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आपली संघटना अ‍ॅग्रेसिव्ह झाली पाहिजे. सातार्‍यात शिवेंद्रराजेंविरोधात अ‍ॅटॅकच केला पाहिजे. सातारा जावली मतदारसंघाचा पुढील आमदार राष्ट्रवादीचा असेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे फर्मानच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी सातार्‍यात काढले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्‍यांची व विविध सेलच्या प्रमुखांची जयंतरावांनी झाडाझडती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे सातारा शहरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांंच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, आ. अरूण लाड, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर, दीपक पवार, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राजकुमार पाटील, सुरेंद्र गुदगे, समिंद्रा जाधव, डॉ. नितीन सावंत, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे पक्षवाढ व सभासद नोंदणीचे काम समाधानकारक न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी परिवार संवाद दौर्‍यात पदाधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. नियुक्त केलेल्या पदाधिकार्‍यांनी महिन्याभरात रिझल्ट द्यावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा ना. पाटील यांनी दिला. यावेळी पदाधिकार्‍यांवर ना. पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.

ना. जयंत पाटील यांनी बैठकीच्या सुरूवातीलाच सेलच्या प्रत्येक पदाधिकार्‍यांना उठवूनच त्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. ना. पाटील यांनी पदाधिकार्‍यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी अनेकांचे त-त-प-प झाले. पदाधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ना. पाटील यांनी त्यांच्या भाषाशैलीत विविध सेलच्या पदाधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. यात फादर बॉडीमधील पदाधिकारीही सुटले नाहीत.

आढावा बैठकीनंतर ना. जयंत पाटील म्हणाले, मी कोण हजर कोण गैरहजर का विचारतोय? तर बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित पाहिजेतच. महिला अध्यक्षाची नियुक्ती अद्याप झालेली नाही. महिलांच्या संघटनेत नक्की काय काम सुरू आहे, हे समजत नाही. तेजस शिंदे हे युवकचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक बूथची कमिटी करू शकतो एवढी आपल्या पक्षात ताकद आहे. पण हे ऑर्गनायझ पध्दतीने न केल्यामुळे आपल्याला फटका बसत आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्याला जर फटका बसला तर त्याचा परिणाम विधानसभेबरोबरच लोकसभेला होईल. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, सर्वांनी बुथ कमिट्या सक्षम करून काम करावे.प्रत्येक तालुकाध्यक्षांनी बुथ कमिट्या बांधण्यासाठी मदत केली पाहिजे. पुढील एक महिना कार्यक्रम हातात घेवून बूथ कमिट्यांची बांधणी करावी. बूथकमिट्या असलेला अध्यक्ष क्रियाशिल आहे का? याची तपासणी करा. खटाव माणला पक्षाची बांधणी झाली तर वेगळा निकाल दिसेल, असेही ना. पाटील म्हणाले.

राज्यात सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष ताकदीनिशी उतरणार आहे. आपल्या हक्काचा हा सातारा जिल्हा आहे. सर्वांनी गांभीर्याने घेवून सभासद नोंदणी करावी. यावेळी मेरीटवर निवडणूक होणार असून त्यानंतरच राष्ट्रवादीच्या विविध सेलवर नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यात 100 टक्के बुथ कमिट्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. बुथ कमिट्या सक्षम झाल्या तर जिल्ह्यात आपले गेलेले वैभव पुन्हा मिळवणे शक्य होणार आहे. सर्व सेलच्या पदाधिकार्‍यांनी गावे वाटून घ्यावीत. बूथ कमिट्या करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही ना. जयंत पाटील यांनी दिल्या.

ऊस नेईपर्यंत गोड बोला; नंतर मात्र त्यांचा कार्यक्रम करा…

मेढा (पुढारी वृत्तसेवा) : परिवार संवाद यात्रेत बर्‍याच शेतकर्‍यांनी आमचा ऊस तोंडे बघून नेला जात आहे. राष्ट्रवादीचा असला की ऊस नेला जात नाही. त्यामुळे पक्षाचे काम करण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी जावलीतील शेतकर्‍यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्या. त्यावर जयंतरावांनी थेट कार्यक्रम करण्याचाच सल्ला दिला. ते म्हणाले, तोंड बघणार्‍यांवर राग मनात धरून ठेवा. ऊस नेईपर्यंत गोड बोला. नंतर मात्र त्यांचा कार्यक्रम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Back to top button