Honey trap : अश्लील चॅटिंगमध्ये अडकवून उकळली लाखोंची खंडणी | पुढारी

Honey trap : अश्लील चॅटिंगमध्ये अडकवून उकळली लाखोंची खंडणी

कवठे; पुढारी वृत्तसेवा : वाई तालुक्यात हनी ट्रॅपद्वारे (Honey trap) तिघांना जाळ्यात ओढून एका महिलेने व तिच्या पतीने त्यांच्याकडून तब्बल साडेचार लाख रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे व सटालेवाडी येथील युवकांचीही अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संशयित महिलेने व्हॉटस् अ‍ॅपवरून अश्लील चॅटिंग करून ते कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग केले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना 20 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराने वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पूनम हेमंत मोरे (वय 30) व हेमंत विजय मोरे (31, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. कुडाळ, ता. जावली) अशी संशयित पती-पत्नीचे नाव आहे. जितेंद्र सोपान जाधव (वय 30, रा. बोपेगाव) याने याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारदार जितेंद्र हा शिवशक्ती सहकारी पतसंस्थेत नोकरी करतो. संशयित महिलेने जाधव याच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चॅटिंग केले. ते चॅटिंग जाधव याच्या कुटुंबातील लोकांना व पतसंस्थेतील लोकांना दाखवून तुझी बदनामी करु, अशी धमकी दिली. (Honey trap)

जाधव यांच्याकडून धनश्री हॉटेल शहाबाग, आधार हॉस्पिटलच्या समोर आदी ठिकाणी बोलावून घेवून 2 लाख 89 हजार 500 रुपये घेतले. तसेच अजून दोन लाख रुपये दे म्हणून सतत पैशाचा तगादा लावला. पैसे दिले नाहीस तर जीवे मारीन, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जाधव याने वाई पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित महिलेस व तिच्या पतीला अटक केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब भरणे, सपोनि रविंद्र तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी केली.

दरम्यान, तालुक्यातून व जिल्ह्यातून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा लोकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अश्लील चॅटिंग (Honeytrap)

संबंधित महिला लग्नाचे आमिष दाखवून, तसेच पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्याचे कारण दाखवून त्यासाठी रक्कम लागल्याचे भासवून प्रथमत: पैसे घेत होती. एकदा सावज जाळ्यात अडकल्यानंतर अश्लील चॅटिंग करून ते कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत लाखो रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत.

Back to top button