सातारा : कराड दक्षिणच्या राजकारणात ट्विस्ट | पुढारी

सातारा : कराड दक्षिणच्या राजकारणात ट्विस्ट

कराड : चंद्रजीत पाटील
मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय सुकर झाला होता. पंचायत समितीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होती. मात्र सातारा जिल्हा बँक निवडणुकीपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच आगामी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर कोणती भूमिका असणार ? याबाबत आत्तापासूनच तर्कविर्तक सुरू आहेत.

2009 साली विधानसभा निवडणुकीवेळी कराड उत्तर व कराड दक्षिण अशा दोन्ही मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. 2009 मधील विधानसभा निवडणुकीपासून ना. बाळासाहेब पाटील गट आणि भाजपा नेते डॉ. अतुल भोसले गटात वितुष्ट आले होते. हे वितुष्ट 2021 पर्यंत कायम होते. मात्र नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीपासून कराड तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपा नेते डॉ. अतुल भोसले गटाने केलेल्या मदतीमुळेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना या निवडणुकीतील सोसायटी गटात विजय मिळवणे सहजशक्य झाले होते. तत्पूर्वी ना. बाळासाहेब पाटील यांचे बंधू शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील 2019 मधील विधानसभा निवडणुकीपासून उघडपणे डॉ. अतुल भोसले यांचा प्रचार करत होते. सध्यस्थितीत जयंत पाटील यांच्याकडे लोकशाही आघाडीची धुरा आली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीपासून डॉ. अतुल भोसले आणि ना. बाळासाहेब पाटील यांच्यातील दुरावा संपला आहे. तर मागील दोन विधानसभा निवडणुकीत ना. बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ज्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केला, त्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांच्या बाजार समिती निवडणुकीबाबतच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील गट एकत्र आल्याने कराड दक्षिणेत काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. बाजार समिती निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचीच बाजू घेणार, अशीच परिस्थिती आहे.

अशा परिस्थितीत डॉ. अतुल भोसले गट ना. बाळासाहेब पाटील गटाची सोबत करणार हेही निश्‍चित आहे. या राजकीय घडामोडींचे पडसाद निश्‍चित कराड पंचायत समितीत पहावयास मिळतील, असेही बोलले जात आहे. सध्यस्थितीत कराड बाजार समितीमधील सत्ताधारी अ‍ॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर गट आणि विरोधी पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाने बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे तयारीही सुरू केली आहे. त्यामुळेच या संघर्षाची परिणीती काय होणार ? याबाबत उत्सुकता पहावयास मिळते.

नगरपालिका राजकारणात समीकरणे बदलणार ?

कराड नगरपालिका निवडणुकीसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी एकत्र येईल ? अशी चर्चा होती. मात्र त्याचवेळी डॉ. अतुल भोसले गटाशी लोकशाही आघाडीची जवळीक वाढली आहे. त्यातच मागील तीन वर्षात अनेकदा लोकशाही आघाडी व राजेंद्रसिंह यादव गट काही मुद्दद्यांवर एकत्र येताना पहावयास मिळाला होता. पालिका निवडणूक लांबणीवर गेली असली तरी कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणती नवी राजकीय समीकरणे उदयास येणार ? याबाबत उत्सुकता पहावयास मिळत आहे.

Back to top button