सातारा : ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ ; शेतकर्‍यांच्या संतप्‍त प्रतिक्रिया | पुढारी

सातारा : ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ ; शेतकर्‍यांच्या संतप्‍त प्रतिक्रिया

ढेबेवाडी (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे राज्यात भारनियमन होऊ देणार नाही, असे ऊर्जामंत्री म्हणतात. तर भारनियमन मुक्‍तीसाठी अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ घेत असताना कराड तालुक्यात मात्र फोर्स लोडशेडिंगच्या नावाने 6 तास ते 8 तास अतिरिक्त भारनियमन लादले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशा कारभारामुळे शेतकर्‍यांना हतबल होत उन्हामुळे करपणार्‍या पिकांकडे पाहत राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

याबाबत वीज वितरण कंपनीच्या कोळेवाडी तसेच पाटण तालुक्यातील तळमावले, ढेबेवाडी अशा विविध सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रातील त्रस्त व हवालदिल शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसा बारा तास वीज पुरवठ्याची मागणी प्रलंबित असतानाही दिवसा आठ तास व रात्री 10 तास असा शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. वीज वितरण कंपनीचे वेळापत्रक वरिष्ठ अधिकारी तर कधी मंत्रालयात ठरवले जाते, असे सांगितले जाते. रात्री नऊनंतर, बारा वाजल्यानंतर असे संपूर्ण रात्र शेतकर्‍यांना शिवारात घालवावी लागेल, असे वेळापत्रक ठरविले जाते.

शेतकर्‍यांना रात्री दहा तास वीज पुरवठा करताना नियमित भारनियमन नसते. मात्र भारनियमनाचा नवा फंडा काढला असून त्याला फोर्स लोडशेडींग असे गोंडस नाव दिले आहे. जर कुठे शहरी भागात विजेची मागणी वाढली, तर शेती वीज पुरवठा फोर्स लोडशेडींगमध्ये टाकायचा व शहरी विभागाला वीज पुरवायची, हा नवा धंदा सुरू झाला आहे. मागील 125 वर्षात कधीही वाढले नव्हते, इतके तापमान वाढले आहे. किंबहुना त्यापेक्षा जास्त तापमान वाढल आहे.

कृष्णा खोर्‍यांच्या गचाळ कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीच्या फोर्स लोडशेडिंगमुळे पिकांसह शेतकर्‍यांनाही होरपळून जात आहेत. पूर्ण रात्र शेतकरी आता येईल, मग येईल, कधी येणार ? अशी प्रतिक्षा करतात. रात्र जागून काढीत आहेत.दिवसा 8 तास मिळणार्‍या वीज पुरवठ्याचे वेळापत्रक तंतोतंत पाळले जात नाही. शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा केला जातो. त्यात किमान चार वेळा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे वीज वितरण कंपनीचा खेळ होतो, पण शेतकरी रात्रभर तळमळतो. तो जीवानिशी जाऊ नये याची तरी जाणीव ठेवत कुणाचे तरी लाड पुरवण्यासाठी शेतकर्‍यांच्या हक्कांवर गदा आणणे बंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने पिके वाळत आहेत. भरमसाट बिल आकारणी करणार्‍या वीज वितरण कंपनीने कारभारात सुधारणा करत अखंडित वीज द्यावी.
– रमेश देशमुख
माजी उपसभापती, कराड

Back to top button