कराड : येणके गावात यापुढे निवडणुका होणार नाहीत | पुढारी

कराड : येणके गावात यापुढे निवडणुका होणार नाहीत

कराड : पुढारी वृत्तसेवा
येणके ता. कराड हे राजकीय दृष्टया संवेदनशील गाव म्हणून परिचित आहे. मात्र ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करूण यापुढे गावात कोणतीही निवडणूक न घेता सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावाने घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल गरुड तर व्हा.चेअरमनपदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे.

निवडणुकांमुळे एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊन तो वाद विकोपाला गेल्याच्या घटना कित्येकदा गावात घडलेल्या आहेत. मात्र यापुढे गावात कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. तर ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणूका ग्रामस्थांच्या पातळीवरती बिनविरोधच करायच्या असा सर्व ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.तीस वर्षात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात सर्व ग्रामस्थांना यश आले तसेच 25 वर्षात पहिल्यांदाच विकास सेवा सोसायटी बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय गाव एकत्र एकवटल्याचे दिसून आले.
येणके येथे माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील व भाजपाचे डॉ. अतुल भोसले या गटांचा प्रभाव आहे. गावातील काही जाणकार, सुशिक्षित व ज्येष्ठ लोकांनी यापुढे गावात कोणतीच निवडणूक लावायची नाही, असा एकमताने निर्णय घेतला आहे. गावच्या विकासासाठी समान जागा वाटपाबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. यातूनच ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे कराड तालुक्यात सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Back to top button