पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : विजेची वाढती मागणी आणि कोयना धरणातील आरक्षित पाणी साठ्यापैकी यापूर्वी वापरलेला पाणी साठा पाहता यंदा मे महिन्यात पश्चिमेकडील पाणी कोटा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांसाठी आरक्षित पाण्यापैकी केवळ 11.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड उन्हाळा व सर्वाधिक मागणीच्या काळात पाण्याअभावी पश्चिमेकडील वीज निर्मिती बंद पडली तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला अंधाराला सामोरे जावे लागेलच.
याशिवाय सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात यावर्षी तब्बल 160 टीएमसी पाण्याची आवक झाली. मार्चपर्यंतच्या 10 महिन्यांत यापैकी पश्चिमेकडे सिंचनासाठी सरासरी 56, पूर्वेकडे सिंचनासाठी 12, पूरकाळात 7.86 व अतिवृष्टी, महापुरात विनावापर सोडलेले 46.45 टीएमसी पाणी असा तब्बल 122.31 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या धरणात 58 टीएमसी पाणी आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पांची एकूण 1960 मेगावॅट क्षमता असली तरी लवादाच्या कोट्यामुळे येथे वर्षभरात सरासरी 20 टक्के क्षमतेनेच वीज निर्मिती होते. कोयना धरणात पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी लवादाच्या निर्णयानुसार आरक्षित कोट्यानुसार 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. पश्चिमेकडे दरमहा सरासरी साडेपाच टीएमसी पाणी वापरले जाते. पावसाळ्यात कमी व उन्हाळ्यात मागणीनुसार विजेसाठी जादा पाणी सोडण्यात येते. त्यामुळे आगामी दोन महिन्यांसाठी विजेसाठी आरक्षित शिल्लक अवघा 11.51 टीएमसी पाणीसाठा सध्या चिंतेचा विषय आहे.
चालूवर्षी कडाक्याच्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली असून सिंचनासाठीही सातत्याने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. मार्च या एकाच महिन्यात तब्बल 17.05 टीएमसी पाणी वापर झाला. यात पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी 12.72 तर पूर्वेकडे सिंचनासाठी 4.27 अशा एकूण 16.99 टीएमसी पाण्यावर मार्चमध्ये तब्बल 394 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
मध्यंतरी कोळसा तुटवड्याच्या काळात व एकूणच दहा महिन्यांत पश्चिमेकडे जादा पाणी वापर झाला. आगामी दोन महिन्यांचा विचार करता या काळात लवादाच्या कोट्यानुसार पाणी वापरले, तर वीज निर्मितीवर कमालीच्या मर्यादा येतील आणि नेमक्या काळातच अंधाराचा सामना करावा लागण्याच्या शक्यता आहेत. स्वाभाविकच यावर्षी पश्चिम वीज निर्मितीसाठी किमान दहा ते पंधरा टीएमसी जादा पाणी वापरणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.
20 टीएमसी पाणी शिल्लक राहू शकते, पण…
आगामी काळात सिंचनासाठी किमान 20 टीएमसी, पश्चिमेकडील वीज निर्मिती आरक्षित 11.51 व मृतसाठा पाच अशा एकूण 36 ते 37 टीएमसी पाणी वापरानंतर जूनमध्ये सरासरी 20 टीएमसी पाणी शिल्लक राहू शकते. तसेच आगामी काळात वीज निर्मितीसाठी किमान 10 ते 15 टीएमसी ज्यादा पाणी वापर झाला, तर त्याचाही परिणाम धरणातील शिल्लक पाणी कोट्यावर होणार आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा
गतवर्षीचा विचार करता एकूण 133 टीएमसी पाणी आवक झाली होती. 31 मे पर्यंत त्यापैकी सिंचनासाठी 32.75 पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 66.98 टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. त्यामुळे जून 2021 मध्ये तब्बल 29.67 टीएमसी पाणी शिल्लक होते. या वर्षी पावसाळ्यात भलेही पाण्याची आवक जास्त झाली असली तरी सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे.
* ऐन उन्हाळ्यात पाणी चिंता वाढणार
* मागणीच्या तुलनेत वीज निर्मितीसाठी पाणी कमी पडणार
* लवाद पाळला तर अंधाराची शक्यता ज्यादा
* पश्चिमेकडे ज्यादा पाणी वापराचा विचार सार्वत्रिक हिताचा
* शासन, प्रशासन सकारात्मक प्रयत्नांची गरज